मुंबई : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर आता कमी झालाय. मात्र तरीही अजून धोका टळलेला नसल्याचं तज्ज्ञांकडून सांगण्यात येतंय. तिसऱ्या लाटेसाठी नागरिकांना सज्ज राहण्याचं आवाहन करण्यात येतंय. तर दुसरीकडे नियमांचं पालन करताना दिसत नसल्याने तिसऱ्या लाटेचा धोका वाढतोय. अशातच भारतात सापडलेल्या कोरोनाच्या पहिल्या रूग्णाला पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केरळमधील थ्रिसूर इथल्या डीएमओ डॉ. के.जे.रीना यांनी सांगितलं की, देशातील पहिली कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण पुन्हा एकदा कोरोनाच्या विळख्यात आली आहे. या रूग्णाचा RT-PCR रिपोर्ट आल्यानंतर संसर्ग झाल्याचं समोर आलं. मात्र अँटीजेन टेस्टमधून ही माहिती समजली नाही. या रूग्णाला कोणतीही लक्षणं दिसून येत नव्हती.


डॉ. रीना पुढे म्हणाल्या, ही रूग्ण पुढील अभ्यासासाठी दिल्लीला जाण्याच्या तयारीत होती. यावेळी तिची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली. ज्यामध्ये तिला कोरोनाची लागण झाली असल्याचं समजलं. सध्या ही रूग्ण होम आयसोलेशनमध्ये असून तिची प्रकृती उत्तम आहे. 


30 जानेवारी 2020 मध्ये वुहान विद्यापीठात शिकणारी तिसऱ्या वर्षाची विद्यार्थीनी कोरोना संक्रमित झाली होती. सेमिस्टरच्या सुट्ट्यांसाठी ती भारतात आली होती आणि याचदरम्यान तिचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला होता. ही देशातील पहिली कोरोनाबाधित रूग्ण ठरली होती. 


यानंतर थ्रिसून रूग्णालयात तिच्यावर जवळपास तीन आठवडे उपचार सुरु होते. 20 फेब्रुवारी रोजी कोरोनाचा अहवाल निगेटीव्ह आल्यानंतर तिला रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. 


दरम्यान आरोग्य मंत्रालयाने पुन्हा एकदा तिसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे. नीति आयोगाचे सदस्य डॉ. वीके पॉल यांनी मंगळवारी सांगितलं की, जगभरात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका आहे. मात्र देशाला या लाटेचा फटका बसू नये यासाठी आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे.