नैसर्गिक प्रजनन क्रियेला शह देत स्त्री-पुरुषाशिवायच जन्माला येणार बाळ? शास्त्रज्ञांचा खळबळजनक दावा

Science News : अनेकदा सायफाय चित्रपट पाहताना त्याच अशा काही चित्रपटांचा, कथानकाचा उल्लेख असतो जिथं कायमच विज्ञानाला शह देणारे सिद्धांत मांडले जातात.
Science News : मंगळावर वास्तव्य करता येण्याजोगं वातावरण असो किंवा मग चंद्रावर वसाहती उभारणं असो. आजवर चित्रपटांमधून किंवा कल्पना विश्वातून अशा अनेक अशक्य गोष्टी मांडण्यात आल्या आणि विज्ञानाला शह देणारे हे सिद्धांत अनेकांच्याच विचारांना चालना देऊन गेले. पण, आता मात्र या गोष्टी फक्त कल्पनांपुरताच मर्यादित राहत नसून, मानवी जीवनावरही विज्ञानाच्या माध्यमातून परिणाम करणारे काही प्रयोग केले जात आहेत.
कल्पना करा की...
समजा एक असं जग असेल जिथं, स्त्री- पुरुष एकत्र न येऊनही बाळांचा जन्म होतो. प्रथमदर्शनी हे एखाद्या चित्रपटाचं कथानक आहे की काय? हाच प्रश्न पडेल. पण, वैज्ञानिक क्षेत्रात झालेल्या प्रगतीमुळं हे सहज शक्य होऊ शकतं ही बाब आता नाकारता येत नाही.
ब्रिटनमधील ह्यूमन फर्टिलाइजेशन एंड एम्ब्रियोलॉजी अथॉरिटी (एचईएफए) च्या माहितीनुसार हल्लीच करण्यास आलेल्या एका निरीक्षणाच्या अहवालांनी सारं जग थक्क होऊ शकतं. कारण, संशोधकांचे प्रयत्न प्रयोगशाळेतच बीज, शुक्राणू विकसित करण्याच्या तंत्रज्ञानाच्या प्रत्यक्ष वापराच्या प्रयोगात अतिशय महत्त्वपूर्ण प्रगती करताना दिसत आहेत.
शास्त्रीय भाषेत या संपूर्ण प्रक्रियेला इन-विट्रो गॅमेट्स (IVG) असं नाव देण्यात आलं असून, येत्या काळात संपूर्ण जगासाठी हे एक क्रांतिकारक पाऊल ठरणार आहे. या तंत्रज्ञानाअंतर्गत त्वचा किंवा स्टेम सेल्सना जनुकियरित्या पुन:र्रचित करत प्रयोगशाळेत मानवी बीज आणि शुक्राणू तयार करण्यात येतात. या संपूर्ण प्रक्रियेतील प्रगती पाहता मानवी प्रजननामध्ये हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल असं ठाम मत एचईएफएच्या सीईओपदी असणाऱ्या पीटर थॉम्पसन यांनी मांडलं आहे.
हेसुद्धा वाचा : Doomsday Clock: 78 वर्षांनंतर काटे फिरले; प्रलयाच्या घड्याळात विध्वंसाचा अलर्ट, अणुयुद्धाची भविष्यवाणी
हा प्रयोग यशस्वी ठरल्यास आणि त्याला सामाजिक स्तरावरही स्वीकारार्हता मिळाल्यास अनेकांसाठी हे एक वरदान ठरु शकतं. पण, संशोधकांचे काही असेही गट आहेत ज्यांनी आतापासूनच या प्रयोगावर प्रश्न उपस्थित केले आहेत. स्त्री- पुरुष संबंध आणि प्रजनन क्रियेच्या नैसर्गिक नियमाविरोधात बाळाच जन्म योग्य असेल का? हाच प्रश्न इथं उपस्थित करण्यात येत आहे. सध्या हा संपूर्ण प्रयोग प्राथमिक स्तरावर असून, पुढील काळात त्यात नेमके कोणते बदल आणि काय नव्या गोष्टी, निरीक्षणं समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
(वरील माहिती निरीक्षणाच्या आधारे उपलब्ध संदर्भातून सदर संस्थेनं प्रसिद्ध केली असून, झी 24 तास याची खातरजमा करत नाही. )