कोणतंही औषध घेण्याअगोदर `या` गोष्टींकडे लक्ष द्या!
औषधांचे होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी खाली नमूद केलेल्या महत्त्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष दिलं पाहिजे.
मुंबई : डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं घेणं धोकादायक ठरू शकतं. अनेक केमिकल्स मिसळून औषधं तयार केली जातात. या औषधात रोग मुळापासून नाहीसा करण्याची क्षमता असते, त्यामुळे खाण्यापूर्वी महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घ्यावी. सल्ल्याशिवाय औषधं घेणं हे नवीन समस्येला आमंत्रण देतं. औषधं घेताना काही गोष्टींची काळजी घेणं फार गरजेचं असतं. औषधांचे होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी खाली नमूद केलेल्या महत्त्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष दिलं पाहिजे.
तुम्हाला दिलेलं औषधं इतरांना देऊ नका
जर डॉक्टरांनी लिहून दिलेलं औषध तुम्ही इतरांना देत असाल असाल तर ही सवय बदला. जर डॉक्टरांनी तुम्हाला तापाचं काही औषध दिलं असेल आणि तुम्ही तेच औषध दुसऱ्या व्यक्तीला देत असाल तर त्या औषधाचा परिणाम तुमच्यावर आणि त्या व्यक्तीवर वेगळा होऊ शकतो. वय, शरीर पाहून डॉक्टर औषध देतात, त्यामुळे ते कोणाशीही शेअर करू नका.
रिकाम्या पोटी औषधं घेऊ नये
जर तुम्ही औषध रिकाम्या पोटी घेत असाल तर काळजी घ्या. अशावेळी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या. सामान्यतः पोटातील गॅसची समस्या दूर करण्यासाठी डॉक्टर रिकाम्या पोटी औषध देतात. परंतु हा नियम प्रत्येक औषधाला लागू होत नाही.
Antibiotics डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्या
तुम्ही जर अँटिबायोटीक औषध घेत असाल, तर ते खाण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. हे रिकाम्या पोटी घ्यावं की, खाल्ल्यानंतर घ्यावं. कारण अनेक औषधांचा पोटावर परिणाम होतो. त्यामुळे लोकांना अॅसिडिटीचा त्रास होण्याची शक्यता असते.
वेगवेगळी औषधं एकावेळी घेऊ नयेत
तुम्हीही वेगवेगळ्या आजारांची औषधं एकावेळी घेत असाल तर असं करणं टाळा. काही लोक थायरॉईडची औषधं तापाच्या औषधासोबत घेतात. किंवा मधुमेहाचं औषध खोकल्याबरोबर किंवा सर्दीच्या औषधासोबत घेतात, यामुळे नुकसान होऊ शकतं. याचा शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे ही चूक करणं टाळा.
पेनकिलरचे जास्त डोस घेऊ नका
अनेक लोकं वेदना कमी करण्यासाठी दररोज पेनकिलर घेतात. मात्र ही सवय चुकीची आहे. शरीराच्या अंतर्गत अवयवांवर याचा वाईट परिणाम होतो. त्यामुळे पेनकिलर घेण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.