मुंबईः उन्हाळ्यात किडनी स्टोनचा त्रास जरा जास्तच जाणवू लागतो. जेव्हा युरिनमध्ये कॅल्शियम, युरीक ॲसिड आणि ऑक्झालेट या घटकांचं प्रमाण वाढतं आणि ते एकत्र येऊ लागतात, तेव्हा युरिन ट्रॅकमध्ये आणि किडनीमध्येही त्याच्या गाठी तयार होतात. त्यालाच आपण किडनी स्टोन किंवा मग मुतखडा म्हणतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


वय, खाण्यापिण्याच्या सवयी, अनुवंशिकता, लाईफस्टाईल अशा अनेक गोष्टी किडनीस्टोन होण्यासाठी आणि तो आजार वाढण्यासाठी कारणीभूत असतात. याचं सगळ्यात मुख्य कारण म्हणजे उन्हाळ्यात डिहायड्रेशनचं वाढलेलं प्रमाण.


उन्हाळ्यात खूप जास्त घाम येतो. त्यामुळे आपोआपच शरीरातली पाणी पातळी कमी कमी होते आणि मग युरिनरी ट्रॅकमध्ये युरीक ॲसिडची पातळी वाढत जाते. 



युरीक ॲसिडचं प्रमाण वाढत गेलं की मग किडनी स्टोनचा त्रास आपोआपच डोकं वर काढू लागतो. त्यामुळेच ज्यांना किडनीस्टोनचा त्रास आहे, अशा लोकांनी उन्हाळ्याच्या दिवसांत विशेष काळजी घ्यावी आणि आहाराची काही पथ्ये आवर्जून पाळावीत.


किडनी स्टोनचा त्रास टाळण्यासाठी काय कराल?
1. शरीरातील पाणी पातळी संतुलित राखण्यासाठी उन्हाळ्यात भरपूर पाणी प्यावे. यामुळे किडनी स्टोनचा त्रास वाढण्याचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी होतो. 


2.. उन्हाळ्याच्या दिवसांत पॅकींगचे अन्नपदार्थ तसेच जास्त खारट पदार्थ, कोल्ड्रिंक्सही घेणे टाळावे. हे ड्रिंक्स खूप जास्त ॲसिडीक असतात. शरीरातील ॲसिडिक घटक वाढले की मुतखड्याचा त्रास वाढू शकतो. 


3. उन्हाळ्यात कॅल्शियमचा वापरही मर्यादित असावा. पण यामुळे शरीरातील कॅल्शियमची पातळी कमी होणार नाही, याची काळजी घ्या. कॅल्शियमची कमतरता इतर काही आजारांचा धोका वाढवते.


4. उन्हाळ्यात हायप्रोटीन डाएट घेणे तसेच खूप जास्त गोड पदार्थ खाणे, यामुळेही किडनी स्टोनचा त्रास वाढू शकतो.