जाणून घ्या काय आहे वॅक्सिन पासपोर्ट?
कोरोनाच्या महामारीने आपल्या प्रत्येकाचं आयुष्य बदलून टाकलं आहे.
मुंबई : कोरोनाच्या महामारीने आपल्या प्रत्येकाचं आयुष्य बदलून टाकलं आहे. अशा परिस्थितीत अनेक देश आहेत जे कोणत्याही पद्धतीने कोविड कॅरियरला देशामध्ये न आणण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत आहेत. दरम्यान भारतात देखील एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रवास करणाऱ्या व्यक्तींना कोरोना निगेटीव्ह रिपोर्ट किंवा वॅक्सिन सर्टिफिकेट मागण्यात येतंय.
सध्या कोरोनाचं संक्रमण कुठेतरी कमी होताना दिसतंय. तर दुसरीकडे जगभरात लसीकरण मोहिमेला वेग देण्यात येतोय. लसीकरणाला सुरुवात झाल्याने इंटरनॅशनल ट्रॅवल म्हणजेच परदेशी प्रवासाला पुन्हा पहिल्याप्रमाणे सुरु करण्याची आशा व्यक्त करण्यात येतेय. मात्र यासाठी वॅक्सिन पासपोर्ट लागू करण्याची तयारी सुरु आहे. काही देशांमध्ये हा वॅक्सिन पासपोर्ट लागूही करण्यात आला आहे. परंतु नेमका हा वॅक्सिन पासपोर्ट काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का??
काय आहे वॅक्सिन पासपोर्ट?
वॅक्सिन पासपोर्ट किंवा इम्युनिटी पासपोर्ट हा एका प्रकारे तुमच्याकडे पुरावा असणार आहे की तुम्ही कोरोनाची लस घेतली आहे याचा. जी व्यक्ती लस घेणार केवळ त्याच व्यक्तीला हा पासपोर्ट मिळू शकणार आहे. त्यामुळे ज्या व्यक्ती परदेशी प्रवास करणार आहेत किंवा फिरायला जाणार आहेत त्यांच्यासाठी आता वॅक्सिन पासपोर्ट सगळ्यात महत्त्वाचा कागदपत्र असणार आहे.
दरम्यान वॅक्सिन पासपोर्टची सुरुवात काही देशांमध्ये झाली आहे. याच वर्षी मार्च महिन्यात चीनमध्ये डिजीटल वॅक्सिन पासपोर्ट या सुविधेला सुरुवात करण्यात आली आहे. यामध्ये पासपोर्टचा अॅपच्या माध्मयातून अॅक्सेस केला जातो. यात कोणतीही ऑथोरिटी क्यूआर कोडच्या माध्यमातून स्कॅन करत संबधित व्यक्तीने वॅक्सिन घेतली आहे की नाही याची माहिती जाणून घेऊ शकते. अशाच पद्धतीने एप्रिल महिन्यात जापानमध्ये डि़जीटल वॅक्सिनची घोषणा कऱण्यात आली होती. मे महिन्यात, यूकेने वॅक्सिन पासपोर्ट सुरू करण्याची घोषणा केली.
युरोपियन युनियननेही आपल्या 27 सदस्य देशांतील नागरिकांना प्रवास करण्यासाठी 'डिजिटल ग्रीन प्रमाणपत्र' देणार आहे. हा डिजीटल ग्रीन पास युरोपियन मेडिकल एजन्सीकडून मंजूर असलेली लस घेतलेल्या लोकांना, कोविडचा रिपोर्ट निगेटीव्ह असणाऱ्यांना अहवाल आणि जे नुकतेच कोरोनाहून बरे झाले आहे त्यांना हा डिजिटल ग्रीन पास दिला जाईल.
आपल्या भारतात सध्या वापरल्या जाणाऱ्या कोविशिल्ड आणि स्पुतनिक व्ही ला जागतिक आरोग्य संघटनेने मंजूरी दिली आहे. मात्र कोवॅक्सिनला अजूनही whoकडून मंजूरी मिळालेली नाही. भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनला जगभरात अनेक देशांनी मंजूरी दिली आहे. मात्र युरोप आणि अमेरिकेने वॅक्सिन पासपोर्टसाठी कोवॅक्सिनला अजूनही मंजूरी देण्यात आलेली नाही.
तुम्हाला कसा मिळू शकेल वॅक्सिन पासपोर्ट?
नुकतंच केंद्र सरकारने आरोग्य सेतू अॅपमध्ये एक फिचर जोडलं आहे. या फीचरच्या मदतीने तुम्ही तुमचं वॅक्सिन स्टेटस थेट पासपोर्टशी लिंक करू शकता
कसा डाऊनलोड करायचा वॅक्सिन पासपोर्ट?
जर तुम्ही लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तर cowin.gov.in वर जा
इथे 'Account Details' सेक्शनमध्ये 'Raise Issue' वर क्लिक करा
या ठिकाणी आता तुम्हाला तीन पर्याय दिसतील. यामधून 'Add Passport Details' ला सिलेक्ट करा. हा ऑप्शन तुम्हाला वेगळ्या पानावर घेऊन जाईल आणि या ठिकाणी तुम्हाला तुमचं नाव सिलेक्ट करावं लागेल.
यानंतर तुम्ही 'Enter Beneficiary’s Passport Number' सेक्शनमध्ये तुमचा पासपोर्ट नंबर टाका
यानंतर तुम्हाला डिक्लेरेशन बॉक्सवर टीक करावं लागेल. सगळं क्रॉस चेक करून बॉक्सवर टीक करा आणि 'Submit Request' वर टीक करा
अखेरीस तुम्हाला तुम्हाला तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर अपडेट झाल्याचा मेसेज येईल. यानंतर तुम्ही पुन्हा 'Account Details' सेक्शनमध्ये जाऊन तिथे 'Certificate' टॅबवर क्लिक करा
इथे तुम्ही तुमचा वॅक्सिन पासपोर्ट डाऊनलोड करू शकता.