मुंबई: आंबा न आवडणारा क्वचितच कोणी असेल. म्हणूनच आंब्याला फळांचा राजा (King of Fruits) म्हटलं जातं. आजकाल बाजारात दसरी, लंगडा, केसर, बदामी असे अनेक प्रकारचे आंबे विकले जातात. आंब्यामध्ये अ, ब, क आणि ई जीवनसत्त्वं तसेच पोटॅशियम, मॅग्नेशियम, तांबे आणि फायबर यांसारखे अनेक पोषक घटक असतात. जे शरीरासाठी सामान्यतः फायदेशीर असतात. शौकीन असलेली लोकं बरेचदा आंबे (Mango) विकत घेतात, पेट्या घरात ठेवतात आणि मनसोक्त खातात. पण कोणतीही वस्तू जास्त प्रमाणात खाल्ल्यास त्याचा फटका आरोग्याला सहन करावा लागतो. जर तुम्हीही आंब्याचे शौकीन असाल आणि चवीमुळे अतिप्रमाणात आंबा खात असाल तर त्याचे दुष्परिणामही (Side Effects of Mango) जाणून घ्या.


मधुमेही रुग्णांच्या समस्येत वाढ 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्यांना मधुमेह आहे, त्यांनी आंबा मर्यादित प्रमाणात खावा. आंब्यामध्ये नैसर्गिक साखर असते. आंबा जास्त प्रमाणात खाल्ल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू शकते, ज्यामुळे तुम्हाला अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.


आंब्यामुळे लठ्ठपणा वाढू शकतो


आंब्यामध्ये कॅलरीज जास्त असतात, मर्यादेपेक्षा जास्त आंबे खाल्ल्याने वजन झपाट्याने वाढते. ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांनी आंबा खाणे टाळावे आणि जरी आंबा खात असाल तर पुरेसा वर्कआउट करावा. जेणेकरुन अतिरिक्त कॅलरीज बर्न होऊ शकतात.


मुरुम आणि फोड येण्याची समस्या


आंबा हे फळ उष्ण मानलं जातं. उन्हाळ्याच्या हंगामात आंब्याच्या अतिसेवनामुळे शरीरात उष्णता देखील वाढू शकते. जे शरीरावर येणाऱ्या फोड आणि मुरुमांचे कारण बनू शकतं. त्यामुळे आंब्याचे सेवन योग्य प्रमाणात करावं. तसेच कापण्याआधी आंबे पाण्यात बुडवून ठेवा, जेणेकरुन त्याची उष्णता कमी होईल.


अतिसाराची समस्या


आंब्यामध्ये भरपूर फायबर असते. फायबर तुमच्या पचनसंस्थेसाठी खूप फायदेशीर आहे. पण जर आंब्याचे जास्त सेवन केले तर फायबरमुळे अतिसार होऊ शकतात. त्यामुळे आंबा खाण्यापूर्वी हे लक्षात ठेवा.


पोटदुखीची समस्या


जर आंबा नीट पिकला नसेल आणि त्याचे जास्त प्रमाणात सेवन केले तर त्यामुळे पचनासंबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. अशा स्थितीत पचनक्रिया बिघडते आणि पोटदुखी तसेच गॅसची समस्या उद्भवू शकते. याशिवाय आंबा जास्त खाल्ल्याने अ‍ॅलर्जीच्या तक्रारीही होऊ शकतात. त्यामुळे जास्त प्रमाणात आंबा खाणे टाळा. एका दिवसात दोनपेक्षा जास्त आंबे खाऊ नका.