Medicine cheap : बातमी सर्वसामान्यांना दिलासा देणारी. देशात अनेक महत्त्वाची औषधं स्वस्त होणार आहेत. (Cheap Medicine) यात रोजच्या वापरातील औषधांचा  समावेश करण्यात आला आहे. पॅरॅसिटॅमोल, एमॉक्सिलिनसह 127 औषधांचा यात समावेश आहे. नॅशनल फार्मास्यूटिकल प्रायसिंग अथॉरिटीकडून (National Pharmaceutical Pricing Authority (NPPA) मंगळवारी 127 औषधांच्या किंमती ठरवण्यात आल्या आहेत. चालू वर्षामध्ये सतत पाचव्यांदा काही औषधं स्वस्त करण्यात आली आहेत. पॅरॅसिटॅमोल सारखी औषधं यंदाच्या वर्षात दुसर्‍यांदा स्वस्त झाली आहेत. 


स्वस्त औषधं बाजारात कधी उपलब्ध होणार ?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

NPPA ने या वर्षी सलग पाचव्यांदा किमती कमी केल्यानंतर किमान 127 औषधे लवकरच स्वस्त होऊ शकतात. सूत्रांनी सांगितले की, दर कपातीनंतर पॅरासिटामॉल, अमोक्सीसिलिन, राबेप्राझोल आणि मेटफॉर्मिन या औषधांच्या किमतीत घट होण्याची शक्यता आहे.  कमी  किमतीतील औषध ही 2023 मध्ये शेवटच्या आठवड्यापासून उपलब्ध होतील.जानेवारी अखेरीस ही स्वस्त औषधं बाजारात उपलब्ध होणार आहेत, असे एका अधिकाऱ्यांने सांगितले.


ही औषधे झालीत स्वस्त


पॅरासिटामॉल (650mg), जे 2.3 रुपये प्रति टॅबलेटमध्ये विकले जाते ते 1.8 रुपये प्रति टॅबलेटमध्ये उपलब्ध असेल. त्याचप्रमाणे, 22.3 रुपयांना विकले जाणारे अमोक्सिसिलिन आणि पोटॅशियम क्लेव्हुलेनेट 16.8 रुपये प्रति टॅबलेटमध्ये उपलब्ध असतील. शिवाय, मोक्सीफ्लॉक्सासिन (400mg) 31.5 रुपयांवरुन 22.8 रुपये प्रति टॅबलेटवर कमी करण्यात आले आहे. न्यूमोनिया सारख्या जिवाणू संसर्गावर उपचार करण्यासाठी औषधेही स्वस्त होणार आहेत. 


दुसरीकडे, काही औषधांच्या किमतीत वाढ झाली आहे.  मधुमेहाच्या (Type II diabetes) उपचारात वापरल्या जाणार्‍या मेटफॉर्मिन (500mg) सारख्या औषधांची किंमत 1.7 रुपयांवरुन 1.8 रुपये करण्यात आली आहे.


काही औषधांच्या किमती आधीच कमी 


किंमतीतील बदलाबद्दल बोलताना, ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट्सचे सरचिटणीस राजीव सिंघल यांनी म्हटलेय , हे स्वागतार्ह पाऊल आहे. पण पॅरासिटामॉलसारख्या काही औषधांच्या किमती आधीच कमी झाल्या आहेत. फार्मास्युटिकल घटकांच्या (API) किमती वाढत असताना, उत्पादकांना किमती आणखी कमी करता येणार नाही. मला आशा आहे की भविष्यात पुरवठ्यावर परिणाम होणार नाही.


तसेच नवीन किंमती असलेली औषधे बाजारात येण्यासाठी साधारणपणे एक महिना लागतो.  पुढील महिन्याच्या अखेरीस नवीन स्टॉक मिळायला हवा. त्यानुसार नवीन किंमत टॅग असलेली औषधे जानेवारीच्या अखेरीस येण्यास सुरुवात होईल, असे सांगण्यात आलेय.