कपिल राऊत, झी २४ तास, मुंबई : कोणत्याही वस्तूच्या अतिवापराचा फटका बसतोच. मोबाईलच्या अतिवापराने विविध आजार जडतात हे आपल्याला माहीत आहे. मात्र, इअरफोनचाही वापर तितकाच धोकादायक ठरू शकतो. आजुबाजूला लक्ष दिलंत तर अनेक जण रेल्वेतून प्रवास करताना किंवा चालताना इअरफोन लावून गाणी ऐकताना किंवा मोबाईलवर चित्रपट आणि वेबसिरीज पाहाताना दिसतील. मात्र अशी तुम्हालाही सवय असेल तर लगेचच ही सवय सोडा... कारण सतत इअरफोन वापरणं तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही जण सर्वसामान्यांप्रमाणे न बोलता जोराने किंवा ओरडून बोलतात. कधी कधी दहा वेळा हाक मारल्यावरसुद्धा संबंधित व्यक्ती प्रतिसाद देत नाहीत, असे प्रकार सर्रास घडताना दिसतात. मात्र हा एक आजार असल्याचं आता समोर आलंय. 



इअरफोनच्या अतिवापरामुळे कमी ऐकू येणे किंवा कानाचे इन्फेक्शन असे आजार जडतायत. शिवाय चिडचिड आणि डोके दुखणे अशा गोष्टीही पाहायला मिळतायत. यासाठी तज्ज्ञांचा वेळीच सल्ला घेणे गरजेचे असून इअरफोनचा वापर कमी करणं गरजेचं आहे, असं कानविकार तज्ज्ञ डॉ. ज्योत्स्ना जगताप सांगतात.


या दुष्परिणामांच्या पार्श्वभूमीवर पालकांनी आपल्या मुलांना इअरफोन वापरापासून परावृत्त करणं गरजेचं आहे. तसंच मोठ्यांनीही कानाच्या विकाराचा धोका समजून घेत इअरफोनचा वापर करणे आवश्यक आहे.