मुंबई : वाढता अॅनिमिया असा आजार आहे ज्याकडे अनेकदा दुर्लक्ष केलं जातं. परंतु नुकताच एसआरएल डायग्नॉस्टिक्सद्वारा केल्या गेलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे देण्यात आलेल्या अहवालानुसार, अॅनिमिया केवळ वयस्कर लोकांमध्येच नाही तर लहान मुलांमध्येही आढळून येत असल्याचे सांगितले आहे. या सर्वेक्षणातून वाढत्या वयासोबत अॅनिमिया होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जानेवारी २०१६ ते मार्च २०१९ दरम्यान घेण्यात आलेल्या हिमोग्लोबिनच्या रिपोर्ट्सच्या आधारावर हे सर्वेक्षण करण्यात आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अॅनिमिया म्हणजे शरीरातील हिमोग्लोबिनची, तांबड्या पेशींची संख्या कमी होणे. रक्तातील लोहाच्या कमतरतेमुळेही अॅनिमिया होतो. अॅनिमियाला पांडूरोग असेही म्हटले जाते. 'एसआरएल'च्या अहवालानुसार, ८० वर्षांहून अधिक वय असणारे ९० टक्के लोक, ६१ ते ८५ वयोगटातील ८१ टक्के लोक, ४६ ते ६० वर्षीय ६९ टक्के लोक, ३१ ते ४५ वयोगटातील ५९ टक्के लोक, १६ ते ३० वर्षातील ५७ टक्के लोक, तसेच ० ते १५ वर्षातील ५३ टक्के लहान, तरूण मुले अॅनिमियाग्रस्त आहेत. 


एसआरएल डायग्नॉस्टिक्सचे डॉ. बी. आर दास यांनी शरीरात तांबड्या रक्त पेशी किंवा हिमोग्लोबिनची कमतरता होण्याने शरीरातील ऑर्गेन सिस्टमला नुकसान पोहचवते. तांबड्या पेशींच्या कमतरतेमुळे शरीरात रक्ताद्वारे ऑक्सिजनचा प्रवाह कमी होतो ज्यामुळे रूग्णाला थकवा, त्वचा पिवळी पडणे, डोकेदुखी, हृदयाचे ठोके अनियमित होणे, धाप लागणे यांसारख्या समस्या होतात. अॅनिमियाचे सर्वसाधारण कारण लोहाची कमी असणे आहे. ज्यावर उपचार करणे सोपे आहे. 


वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते, जगभरात दोन अब्ज लोक अॅनिमियाग्रस्त आहेत. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने अॅनिमिया तीन स्तरांमध्ये होत असल्याचे सांगितले आहे. माइल्ड (हलका), मॉडरेट (मध्यम) आणि सीवियर (गंभीर) असे प्रकार असतात. भारतातील इतर भागाच्या तुलनेत उत्तरी भागात अॅनिमियाचे सर्वाधिक रूग्ण आढळले आहेत.