निपाह व्हायरसमुळे 200 हून अधिक जणं आयसोलेशनमध्ये
केरळमध्ये निपाह व्हायरसने शिरकाव केला असून 12 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे.
केरळ : देशासमोर अजून कोरोनाचं संकट आहे. अशातच आणखी एक आव्हान समोर आहे ते म्हणजे निपाह व्हायरसचं. केरळमध्ये निपाह व्हायरसने शिरकाव केला असून 12 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. तर आता जिल्ह्यातील इतर काही लोकांमध्ये या विषाणूची लक्षणं दिसू लागल्यानंतर प्रशासनाने पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे.
सँपल्सची होतेय तपासणी; हाय रिस्कवर नजर
कोझिकोड परिसरातच सुमारे 11 लोकांमध्ये निपाह विषाणूची लक्षणं आढळली आहेत. केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांच्या मते, पुण्याच्या प्रयोगशाळेत एकूण 8 उच्च जोखमीचे संपर्क नमुन्यांसाठी पाठवण्यात आले आहेत. मुलाच्या वडिलांच्या संपर्कात आलेल्या आरोग्य कर्मचाऱ्याचे नमुने निगेटिव्ह आले आहेत ही समाधानकारक बाब आहे.
केरळच्या कोझिकोड वैद्यकीय महाविद्यालयात निपाह व्हायरसच्या नमुन्यांची चाचणी केली जातेय. सुमारे 48 उच्च जोखमीच्या संपर्कांना रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे. यातील 31 कोझिकोडमधील आहेत, तर उर्वरित वायनाड, मल्लपुरम आणि पल्लक्कड इथले आहेत.
दरम्यान निपाहमुळे मृत्यू झालेल्या मुलाच्या संपर्कात आलेल्या सुमारे 251 लोकं आले होते. ज्यांना आयसोलेट केलं गेलं आहे. त्यापैकी 129 आरोग्य कर्मचारी आहेत. वैद्यकीय पथक सातत्याने लोकांवर नजर ठेवून आहे, तर एनिमल हस्बेंड्री टीम देखील आसपासची झाडं आणि परिसर पाहत आहे. ज्या ठिकाणी वटवाघळं येण्याची शक्यता आहे तेथून नमुने गोळा केले जात आहेत.
केंद्र सरकारच्या वतीने निपाह विषाणूच्या पार्श्वभूमीवर केरळ सरकारलाही सतर्क राहण्यास सांगितलं आहे. केंद्राने राज्य सरकारला एक पत्र लिहिलं आहे, ज्यामध्ये कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, हॉस्पिटल्स तयार करण्याविषयी चर्चा करण्यात आली आहे. केंद्राकडून कोझीकोडला एक टीम आधीच पाठवण्यात आली आहे, ज्या टीमकडून प्राथमिक अहवाल देण्यात आला आहे.