मुंबई : देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर, बहुतेक राज्यांमध्ये निर्बंध शिथिल केले जातायत. दरम्यान संभाव्य तिसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेता, सर्व प्रकारच्या खबरदारी देखील घेतल्या जात आहेत. मात्र याच दरम्यान, मुंबई महानगरपालिकेने मुंबई उच्च न्यायालयाला कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता नाही असं सांगितलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई महापालिकेला न्यायालयाला सांगितलं की, तिसरी लाट येण्याची शक्यता नसली तरीही त्यांची लसीकरण मोहीम चांगली सुरू आहे. आतापर्यंत, 42 लाखांहून अधिक लोकांचं पूर्णपणे लसीकरण करण्यात आलं आहे, तर 82 लाखांहून अधिक लोकांना लसीचा पहिला डोस मिळाला आहे.


मुंबई महापालिकेचे वकील अनिल साखरे यांनी न्यायालयाला सांगितलं की, पूर्णपणे अंथरुणाला खिळलेल्या 2,586 लोकांना पूर्णपणे लसीकरण करण्यात आलं आहे, तर अशा 3,942 लोकांना पहिला डोस मिळाला आहे. आता लसींची कमतरता नाही. मुंबई सुरक्षित आहे. आम्हाला तिसरी लाट (कोरोना विषाणू संसर्ग) येताना दिसत नाही.


सरन्यायाधीश दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती जी. एस. कुलकर्णी यांच्या खंडपीठात वकील धृती कापडिया आणि कुणाल तिवारी यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी सुरू होती. जनहित याचिकेत केंद्र आणि महाराष्ट्र सरकारला विनंती करण्यात आली होती की, 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, अपंग आणि पूर्णपणे अंथरुणाला खिळलेल्या लोकांचं घरोघरी लसीकरण करावं. 


केंद्र सरकारने यापूर्वी सांगितलं होतं की, ते लोकांना घरोघरी जाऊन लसीकरण करू शकणार नाही. परंतु, गेल्या महिन्यात त्याला मान्यता देण्यात आली. महाराष्ट्र सरकारने ऑगस्टमध्ये सांगितलं की, त्यांच्याद्वारे मोहीम सुरू करतील आणि पायलट प्रोजेक्टचा भाग म्हणून अंथरुणाला खिळलेल्या लोकांचं घरोघरी लसीकरण सुरू केलं जाईल.