मुंबई : राज्यात कोरोनाचे रूग्ण सापडत आहेत. मुंबईत देखील कोरोनाची प्रकरणं आढळत आहेत. अशातच मुंबई महापालिकेने कोरोनाला रोखण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. यानुसार आता लक्षणं नसली तरीही कोरोना पॉझिटीव्ह व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची तातडीने टेस्ट करावी लागणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसरी लाट ओसरत असून सरकारने निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला. यानंतर शहरात वाढणारी वर्दळ, बाहेरील राज्यातून येणाऱ्यांची गर्दी तसंच आगामी सण लक्षात घेता संसर्ग आटोक्यात ठेवण्यासाठी लक्षणं नसली तरी कोरोनाची लागण झालेल्यांच्या संपर्कातील सर्व व्यक्तींच्या तात्काळ चाचण्या करण्याच्या सूचना पालिकेने विभागांना दिल्या आहेत.


मुंबई महापालिकेने दिलेल्या सूचनांनुसार, जर एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असेल आणि त्याच्या संपर्कात इतर व्यक्ती आल्या असतील तर त्यांची तातडीने कोरोनाची टेस्ट करून घ्यावी. यासाठी 4-5 दिवसांची वाट पाहू नये. त्याचप्रमाणे लक्षणं नसतील तरीही टेस्ट करून घ्यावी.


दरम्यान मुंबईतील कोरोनाची आकडेवारी गेल्या आठवड्याच्या तुलनेत १९ टक्क्यांनी वाढली असल्याचं आढळलं आहे. यात प्रामुख्याने गृहनिर्माण संकुलांमध्येच संसर्गाचं प्रमाण काही प्रमाणात वाढलं आहे. त्यामुळे शहरातील प्रतिबंधित इमारतींची संख्याही आठवडाभरात 22 वरून 31 वर गेली आहे. 


मुंबईत जुलैच्या शेवटच्या आठवड्यात प्रतिदिन साडेतीनशेहून अधिक रुग्णांची भर पडत होती. ऑगस्टपासून हे प्रमाण कमी होत सुमारे अडीचशेपर्यंत आले होते. परंतु गेल्या काही दिवसांपासून पुन्हा काही प्रमाणात रुग्णसंख्या वाढताना दिसतेय.