मुंबईकरांचा श्वास कोंडतोय; वाढत्या प्रदूषणामुळे होतोय हा त्रास!
आता दिल्लीप्रमाणे मुंबईत देखील हवेच्या प्रदूषणात वाढ होताना दिसतेय.
मुंबई : सध्या देशभरात दिल्लीमध्ये हवेचं मोठ्या प्रमाणात प्रदूषण असल्याची नोंद आहे. मात्र आता दिल्लीप्रमाणे मुंबईत देखील हवेच्या प्रदूषणात वाढ होताना दिसतेय. नुकत्याच हातात आलेल्या माहितीनुसार मुंबईकरांमध्ये श्वसनासंबंधीच्या विकारांत 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ही फार चिंतेची बाब आहे.
वायू प्रदुषणामुळे मुंबईकरांचा श्वास कोंडतोय. गेल्या 2 वर्षांत श्वसनविकारांच्या रुग्णांत 40 टक्के वाढ झाली आहे. यामुळे दमा, फुफ्फुसाचे आजार असणाऱ्यांना अधिक धोका आहे. गेल्या 19 वर्षांत राज्यात श्वसनरोगांमुळे मृत्यूची संख्या 10 टक्क्यांनी वाढली आहे.
वाढत्या लोकसंख्येच्या गरजा भागविण्यासाठी घरांची बांधणी, शहराच्या विस्तारासाठी वृक्षतोड, वाढणारे उद्योग ही काही कारणे मुंबईतील प्रदूषण वाढण्यास कारणीभूत आहेत. दक्षिण मुंबईसह मध्य मुंबईतील लॉडाकऊन उघडल्यानंतर पुन्हा एकदा बांधकामांना वेग आला आहे. या कामांवरून सतत धूळ उडत असते. ही धूळ संपूर्ण वातावरणात पसरते. त्यामुळे हवेची गुणवत्ता सातत्याने खालावत चालली आहे.
मुंबईत हिवाळा नसला तरी अनेक भागात पहाटे धुकं असतं. अशा प्रकारे धुकं, धूळ आणि धूर मिळून प्रदूषणाची पातळी वाढतेय. त्यामुळे मुंबईकरांना आरोग्याच्या अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे.