मुंबई : उन्हाळ्याच्या दिवसात वातावरणात होणारा बदल, एसी किंवा अति थंड पदार्थांचं सेवन झाल्याने सर्दीचा त्रास होतो. काही जणांना हा त्रास अ‍ॅलर्जीमुळेदेखील होऊ शकतो. त्यामुळेच उन्हाळ्यात सर्दीचा त्रास झाल्यास अनेक जण हैराण होतात. मग उन्हाळ्यातील सर्दीचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी नेमके कोणते घरगुती उपाय करावेत ? याकरिता हा खास सल्ला नक्की जाणून घ्या.  


घरगुती उपायाने आटोक्यात ठेवा सर्दीचा त्रास - 


 कांदा  - कांद्याचे 2-3 तुकडे, प्रत्येक तुकड्यावर मध पसरून त्यावर पुन्हा कांद्याची चकती ठेवा. 10-12 तास हे अशाप्रकारेच ठेवा.  त्यानंतर हे सिरप दिवसातून 2 घेतल्यास आराम मिळेल. 
 
 हळद - ग्लासभर गरम पाण्यात चमचाभर मीठ आणि हळद मिसळा. या मिश्रणाने गुळण्या केल्याने घशातील खवखव कमी होण्यास मदत होईल. 
 
 लसूण - एका लसणाच्या पाकळ्या, चमचाभर मध, 2 चमचे लिंबूपाणी आणि 4-5 काळामिरीचे दाणे हे मिश्रण एकत्र करून प्यायल्यास आराम मिळते. 
 
 हर्बल टी - चमचाभर धण्याचे दाणे, अर्धा चमचा बडीशेप, मेथी दाणे, जिरं  हे मिश्रण नीट भाजा. दीड चमचा हे मिश्रण पाण्यात मिसळून उकळा. उकळलेलं पाणी गाळून घ्या. गाळलेलं पाणी मधासोबत मिसळा. हे मिश्रण दिवसातून दोन वेळेस प्यायल्यास आराम मिळतो. 
 
 मध - 2 चमचे मधामध्ये,  चमचाभर आल्याचा रस आणि लिंबाचा रस मिसळा. हे मिश्रण दिवसातून 2-3 वेळेस प्यायल्यास फायदा होईल. 
 
 आलं - कपभर पाण्यात आल्याचा तुकडा मिसळा. हे मिश्रण एकत्र उकळा. त्यामध्ये मध मिसळून प्यायल्याने फायदा होईल.