Home made natural mosquito repellent: पावसाळ्याचे दिवस आहेत. अशात तुमच्या घरात मच्छर येण्याचं प्रमाण देखील वाढलं असू शकतं. डासांपासून आपल्याला डेंगी, मलेरिआ अशा भयंकर आजारांचा सामना करावा लागू शकतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डास पळवण्यासाठी तुम्ही घरामध्ये रिपेलंट कॉईल, रिपेलंट लिक्विड किंवा डास पळवण्याच्या उदबत्त्या लावत असाल. मात्र, या सर्व गोष्टी केमिकल्सपासून बनवल्या असल्याने आपल्या आरोग्यावर याचे दुष्परिणाम पाहायला मिळू शकतात.


या बातमीतून तुम्ही घरच्या घरी कशा प्रकारे नैसर्गिक पद्धतीने डास पळवण्याचं लिक्विड बनवू शकतात, याबाबत माहिती जाणून घेणार आहोत. 


तुम्ही घरामध्ये मच्छर पळवण्यासाठी ज्या गोष्टी वापरतात त्यांमध्ये केमिकल्स असतात. तुम्ही जेव्हाही या गोष्टी वापरतात तेंव्हा कायम तुमच्या श्वसनातून या गोष्टी तुमच्या शरीरातही जात असतात.


या केमिकलयुक्त गोष्टींनी तुम्हाला श्वसनाचे आजार किंवा फुफुसासंबंधित आजार होऊ शकतात. म्हणूनच घरच्या घरी अगदी कमी साहित्यात कमी वेळेत तुम्ही डास पळवण्याचं लिक्विड बनवू शकतात. 


यासाठी तुम्हाला कोणकोणत्या वस्तू लागतील लागतील?   


हे लिक्विड बनवणं अत्यंत सोपं आहे. यासाठी तुम्हाला एक रिकामं लिक्विड रिपेलंट व्हेपोरायझर आणि लिक्विड रिपेलंट व्हेपोरायझर लावण्यासाठी जुनी मशीन लागेल.


सोबतच एक वाटी कडुलिंबाचा पाला, शुद्ध कापराच्या  8 ते 10 वड्या  आणि एक ग्लास पाणी लागेल. 


असं बनवा नैर्सगिक लिक्विड व्हेपोरायझर


एक ग्लास पाण्यात एक वाटी कडुलिंबाचा पाला चांगला उकळून घ्या. कडुलिंबाचा पाला आणि उकळलेलं पाणी थंड झाल्यावर मिक्सरमधून काढा किंवा ब्लेंडरने बारीक करून घ्या.


आता हे पाणी नीट गाळून घ्या. यानंतर कापराच्या वड्यांची बारीक पावडर करून ही पावडर कडुलिंबाच्या पाण्यात मिक्स करा.


यानंतर हे पाणी जुन्या कोणत्याही व्हेपोरायझरमध्ये टाका. तुमचं नैसर्गिक, केमिकल फ्री व्हेपोरायझर वापरास तयार. 


हे व्हेपोरायझर वापरून किती फायदा होतोय हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा. 


( विशेष नोंद - वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन जीवनात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या. )