मुंबई : कोविडचा हा काळ केवळ भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी एक मोठी समस्या बनली आहे. भारतात कोरोनाची दुसरी लाट आली आणि या लाटेचा फटका अनेक नागरिकांना बसला. यामध्ये लहान मुलांना देखील कोरोनाचा धोका निर्माण झाला. लहान मुलांना होणारा कोरोनाचा धोका पाहता आयुष मंत्रालयाने काही मार्गदर्शकतत्त्व जारी केली आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते असं मत व्यक्त करण्यात येतंय. तज्ञांच्या मते, तिसरी लाट ही मुलांसाठी खूप धोकादायक असू शकते. अशा परिस्थितीत आयुष मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, आयुर्वेदिक आणि निसर्गोपचार वापरुन, मास्क घालणं, योगासनं करणं, कोरोनाची पाच लक्षणं ओळखणं, डॉक्टरांचा सल्ला घेणं तसेच पालकांना ही लस घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.


आयुष मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेली मार्गदर्शक तत्त्व खालीलप्रमाणे-


  • कोरोना रोखण्यासाठी प्रथम उपाय म्हणजे मास्क घालणं, हात धुणं आणि सोशल डिस्टंसिंग अंतर राखणं. मुलांनी याचा वापर केलाच पाहिजे. यासाठी पालकांची जबाबदारी आहे की त्यांनी मुलांसंबंधी जागरूक केलं पाहिजे.

  • 5 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांनी मास्क घालणं आवश्यक आहे. तर 2 ते 5 वर्षे वयोगटातील मुलांनी मास्क त्यांच्या इच्छेवर अवलंबून आहे. तर पालकांनी या मुलांची काळजी घ्यावी.

  • लहान मुलांनी शक्यतो घरीच राहावं तसंच प्रवास करणं टाळलं पाहिजे. पालकांनी व्हिडिओ आणि फोन कॉलद्वारे मुलांना मित्र आणि दूरच्या नातेवाईकांशी संपर्कात ठेवावं.

  • मुलांमध्ये कोरोनाच्या संसर्गाची लक्षणं दिसल्यास त्यांना वृद्धांपासून दूर ठेवा.


या लक्षणांद्वारे ओळखा लहान मुलांमधील कोरोना संक्रमण


  • मुलांना 4-5 दिवसांपेक्षा अधिक काळ ताप असेल

  • मुलाची अन्नावरील इच्छा कमी होणं

  • मुलांना श्वास घेण्यास त्रास होणं

  • मूल सुस्त वाटणं

  • जर यापैकी कोणतीही लक्षणं मुलांमध्ये दिसत असतील तर तातडीने डॉक्टरांची मदत घ्या


मुलांची देखभाल अशी करा


  • मुलांमध्ये जर संक्रमणाची लक्षणं दिसून येत असतील तर त्यांना पिण्यासाठी कोमट पाणी द्या

  • 2 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या मुलांना सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी दात घासण्यास सांगावं

  • 5 वर्षापेक्षा जास्त वयाच्या मुलांना तेलाने मालिश करावं 

  • तेलाने मालिश, प्राणायाम, ध्यान आणि इतर शारीरिक व्यायाम करण्यास 5 वर्षांवरील मुलांना प्रोत्साहित केलं जावं.

  • आयुर्वेदिक उपायांनुसार, मुलांची प्रतिकारशक्ती बळकट करण्यासाठी हळदीचं दूध, च्यवनप्राश आणि नैसर्गिक औषधी वनस्पतींचा काढा द्यावा.