मुंबई : कोरोना व्हायरससंदर्भात 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी केंद्र सरकारने नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. या गाईडलाईन्समध्ये लहान मुलांना रेमडेसिविर इंजेक्शन लहान मुलांना देण्यावर सक्त मनाई करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 5 वर्ष आणि त्यापेक्षा लहान मुलांना मास्क लावण्याची गरज नसल्याचंही या गाईडलाईन्समध्ये नमूद करण्यात आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या आरोग्य सेवा संचालनालयातर्फे या गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत. यामध्ये लक्षणं नसलेल्या आणि सौम्य लक्षणं असलेल्या लहान मुलांमध्ये CBC, LFT, KFT तसंच युरीन रूटीन यांच्या तपासणीची गरज नसल्याचं म्हटलंय. 


दरम्यान पालकांना आयसोलेशनमध्ये असलेल्या मुलांच्या संपर्कात राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. लक्षणं नसलेल्या आणि सौम्य लक्षणं असलेल्या लहान मुलांमधील ऑक्सिजन लेवल तपासण्यासाठी त्यांना 6 मिनिटांचा वॉक टेस्ट द्यावा. जर ऑक्सिजन लेवल 94 टक्क्यांपेक्षा खाली आलेा किंवा मुलाला श्वास घेण्यास त्रास होत असेल तर त्वरित डॉक्टरांची मदत घ्यावी असं गाईडलाईन्समध्ये नमूद करण्यात आलं आहे. 


5 वर्षांपेक्षा लहान मुलांना मास्कची गरज नाही


5 वर्ष किंवा त्या खालील लहान मुलांना मास्क लावण्याची आवश्यकता नसल्याचंही सरकारने म्हटलंय. तर 6 ते 11 वर्षे वयोगटातील मुलं पालकांच्या निगराणीत मास्क लावतील तर 12 वर्षांची मुलं आणि त्यापेक्षा अधिक वयाच्या मुलांनी प्रौढांप्रमाणेच मास्कचा वापर करायचा आहे.