Health News : चार वर्षांपूर्वी कोरोनाच्या (Corona) संकटानं संपूर्ण जगभरात थैमान घातलं आणि पाहता पाहता हा विळखा आणखी घट्ट होत गेला. इथं कोरोना अतिशय वेगानं फोफावत असतानाच तिथं आणखीही काही रोगांनी संपूर्ण जगावरील संकट वाढवलं. अशाच एका गंभीर संकटानं आतापासूनच साऱ्या विश्वाला सतर्क केलं असून, वेळीच सावधगिरी बाळगली नाही, तर 2030 पर्यंत आरोग्यावरील संकटानं 100 कोटींहून अधिकजण बाधित असतील अशी धक्कादायक आकडेवारी निरीक्षणातून समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाच्या महामारीच्याच वेगानं फोफावणारी ही व्याधी आहे, स्थुलता. जगभरात स्थुलता एक गंभीर समस्या ठरत असून, त्याचा सर्वाधिक परिणाम भारतासह इतर आशियाई देशांवरही दिसून येत आहे. एका निरीक्षणातून समोर आलेल्या आकडेवारीनुसार 2030 पर्यंत जगाच्या पाठीवर जवळपास 100 कोटींहून अधिक लोकसंख्या स्थुलतेचा सामना करताना दिसेल, ज्यामध्ये दर पाचपैकी एका महिलेला आणि सातपैकी एका पुरुषाला स्थुलतेची समस्या भेडसावत असेल. भविष्याच्या दृष्टीनं ही आकडेवारी चिंता वाढवणारी असून त्याचा शारीरिक स्थितीवर वाईट परिणाम होताना दिसत आहे, इतकंच नव्हे, तर यामुळं अनेक गंभीर आजारांनाही बोलावणं पाठवलं जात असल्याचं चित्र आहे. 


ऑस्ट्रेलियातील रूरल हेल्थ रिसर्च इंस्टीट्यूट, नेपाळ आणि इथिओपियातील संशोधक आणि अभ्यासकांनी केलेल्या निरीक्षणानुसार 15 ते 49 वर्षांच्या महिलांमध्ये स्थुलता महामारीप्रमाणं बळावत असून, यामध्ये भारत, म्यानमानर, बांगलादेश आणि नेपाळसह 10 आशियाई देशांमध्ये महिला अधिक अडचणीत असल्याचं स्पष्ट होत आहे. मागील दोन दशकांपासून हा आलेख सातत्यानं उंचावतोय ही चिंतेची बाब. 


हेसुद्धा वाचा : महिनाभर सकाळी रिकामेपोटी नारळ पाणी प्यायल्यावर होतील अद्भुत फायदा


 


एकटं मालदीव वगळता उर्वरित अनेक देशांमध्ये स्थुलतेची आकडेवारी चिंता वाढवणारी आहे. यामध्ये भारतातील आकडा झपाट्यानं वाढत असून, 2005 मध्ये जिथं फक्त 2.5 टक्के महिला स्थुलतेचा सामना करत होत्या, तिथं आता हा आकडा 5 टक्क्यांनी वाढला आहे. वाढत्या वजनामुळं उदभवणाऱ्या या समस्येमध्ये अनेक गंभीर आजारांना बोलावणंही पाठवलं जात आहे. यामध्ये प्रामुख्यानं हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि पक्षाघाताचा समावेश आहे. वेळीच स्थुलतेवर उपाय न केल्यास 2030 पर्यंत ही स्थिती एका महामारीचंही रुप घेऊ शकते असाही इशारा या निरीक्षणाच्या निष्कर्षांच्या आधारे देण्यात आला आहे. 


वाढतं शहरीकरण, विचित्र जीवनशैली आणि अधिकाधिक वेळ टीव्हीसमोर बसून राहणं ही स्थुलतेची मुख्य कारणं सांगितली जात आहेत.  सतत बाहेरचं खाणं, अनियमित आहार आणि व्यायामाचा अभाव यामुळंही हे संकट अधिक बळावचताना दिसत असून, सरकार आणि आरोग्य यंत्रणांनी त्यावर वेळीच तोडगा शोधावा असा इशारा या निरीक्षणानंतर देण्यात येत आहे.