मुंबई : देशावरून अजून कोरोनाचं संकट टळलेलं नाही. अशातच कोरोनाचे नवे वेरिएंट समोर येतायत. त्यातच सध्या डेल्टा वेरिएंटने थैमान घातलं आहे. तर दुसरीकडे भारतात डेल्टामुळे कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाल्याची माहिती जनुकीय क्रमवारी लावणाऱ्या इन्साकॉग संस्थेने दिलीये. यामुळे पुन्हा एकदा आरोग्य विभागाचं टेन्शन वाढलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतात डेल्टा विषाणूचं प्रमाण वाढल्याचं इन्साकॉग संस्थेने म्हटलंय. 30 हजारांपैकी 20 हजार नमुने डेल्टाचे असल्याचे या संस्थेचं म्हणणं आहे. देशात डेल्टा प्लसचे 61 नमुने आतापर्यंत सापडल्याची माहिती या संस्थेकडून देण्यात आलीये. लसीकरणाचा कमी होणारा प्रभाव, प्रसार रोखण्यातील उपायांना अपयश यामुळे डेल्टा विषाणूचा प्रसार वाढत असल्याचं इन्साकॉग संस्थेने सांगितलंय.


इन्साकॉग संस्थेकडून बुलेटिन जारी करताना म्हटलंय, INSACने डेल्टा प्रकारावर चिंता व्यक्त केली आहे. आतापर्यंत 72 हजारांहून अधिक नमुन्यांचं जीनोम सिक्वन्सिंग केलं गेलं आहे, ज्यामध्ये 20 हजारांहून अधिक नमुन्यांमध्ये डेल्टा व्हेरिएंट सापडला आहे.


अहवालानुसार, देशात आतापर्यंत 72,931 नमुन्यांचे जीनोम सिक्वन्सिंग केलं गेलं आहे. त्यापैकी 30,230 मध्ये कोरोनाचे गंभीर वेरिएंट सापडले आहेत. यामध्ये 20,324 नमुन्यांमध्ये डेल्टाचा प्रकार अधिक सापडला आहे. डेल्टामधूनच उद्भवलेले कप्पा आणि डेल्टा 15407 नमुन्यांमध्ये आढळलेत. याशिवाय 4218 मध्ये अल्फा, 218 मध्ये बीटा आणि दोन नमुन्यांमध्ये गामा व्हेरिएंट सापडले आहेत.


इन्साकॉगच्या मते, आतापर्यंत डेल्टा प्रकारातच 13 म्युटेशन झाले आहेत. त्यापैकी पाच भारतात देखील आहेत. अमेरिका, यूके आणि चीनसह जगातील 100 हून अधिक देशांमध्ये, डेल्टा व्हेरिएंटमुळे महामारी पुन्हा वाढत आहे.