मुंबई : कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरिएंटचा अनेक देशांमध्ये झपाट्याने पसरतोय. भारतातही कोरोना आणि ओमाक्रॉनची प्रकरण वाढत असल्याचं दिसून येतंय. अशातच भारतीय SARS-CoV-2 Genomics Consortium (INSACOG) ने आपल्या बुलेटिनमध्ये म्हटलंय की, कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरिएंट भारतात कम्युनिटी स्प्रेडिंगच्या टप्प्यावर पोहोचला आहे. मुख्य म्हणजे महानगरांमध्ये याचा प्रभाव मोठ्या प्रमाणात दिसून येतोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

INSACOGने असा दावा केला जातोय की, ओमायक्रॉनमुळे नवीन प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. आतापर्यंत, ओमायक्रॉनला सौम्य किंवा लक्षणं नसलेला संसर्ग मानलं जातं होतं. मात्र रुग्णालयांसोबतच आयसीयूमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. 


याशिवाय, B.1.640.2 या नवीन व्हेरिएंटवर बारकाईने लक्ष ठेवलं जाणार असल्याचंही INSACOGकडून सांगण्यात आलंय. आतापर्यंत या व्हेरिएंटचा प्रसार झाल्याचं कोणतेही पुरावे नाहीत. त्याचवेळी भारतात याचं एकंही प्रकरण समोर आलेलं नाही.


संस्थेच्या अहवालात असं म्हटलंय की, दिल्ली आणि मुंबईसारख्या शहरांमध्ये कम्युनिटी स्प्रेड झालं आहे. याठिकाणी रूग्णांमध्ये झपाट्याने वाढ होण्याची शक्यता आहे. बाहेरून येणाऱ्या रुग्णांऐवजी अंतर्गत संसर्गाची प्रकरणं समोर येऊ शकतात. 


INSACOG ने पुढे म्हटलंय की, "भारतात ओमायक्रॉन व्हेरिएंटचा प्रसार आता परदेशी प्रवाशांद्वारे नव्हे तर अंतर्गत प्रसारणाद्वारे होणार आहे. जीनोमिक चाचणीसाठी INSACOG चं सॅम्पलिंग आणि सिक्वेन्सिंग धोरण तयार केलं जातंय."


ओमायक्रॉन व्हेरिएंटचा कम्युनिटी स्प्रेड टाळण्यासाठी, आरोग्य मंत्रालयाचे निर्बंध पाळावेत. मास्क, सॅनिटायझेशन, लसीकरण हे महत्त्वाचं असून याचं पालन करणं आवश्यक आहे.