ओमायक्रॉन पसरतोय! देशात पाच नव्या रूग्णांची नोंद
देशात अजून 5 ओमायक्रॉनचे रूग्ण सापडले आहे.
मुंबई : कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनची संपूर्ण जगाला चिंता आहे. दक्षिण आफ्रिकेत सापडलेला हा व्हेरिएंट आतापर्यंत अनेक देशांमध्ये सापडला आहे. भारतातही या व्हेरिएंटने शिरकाव केला असून देशात अजून 5 ओमायक्रॉनचे रूग्ण सापडले आहे.
यामुळे आता देशात कोरोनाचा ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या 38 वर पोहोचली आहे. रूग्णांची वाढत्या संख्येवर केंद्र सरकारने चिंता व्यक्त केली आहे. यासंदर्भात विषय समितीची विशेष बैठक होणार असल्याची माहिती आहे. आणि या बैठकीत बुस्टर डोससंदर्भात चर्चा करण्यात येणार आहे.
दरम्यान नागपुरमध्येही ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळला आहे. 40 वर्षांचा हा रुग्ण असून तो दक्षिण आफ्रिकेतून आल्याची माहिती आहे. या रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. सध्या एम्समध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
नागपूर महापालिकेच्या आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णाने लशीचा एकही डोस घेतलेला नाहीये. त्याला सौम्य लक्षणं असून, त्याची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान रुग्णाच्या कुटुंबातल्या इतर सदस्यांची कोरोना चाचणी निगेटीव्ह आलीय.
महाराष्ट्र राज्यातल्या ओमायक्रॉन कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता 18 वर गेली आहे. त्यापैकी 9 जण कोरोनामुक्तही झाल्याची नोंद आहे. या रूग्णांना डिस्चार्ज देखील देण्यात आला आहे. दुसरीकडे देशातली संख्याही चारने वाढून 38 झाली आहे. दरम्यान आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि चंदीगडमध्येही ओमायक्रॉनचा प्रत्येकी एक रुग्ण सापडला.