ओमायक्रॉन टेन्शन वाढवतोय, आरोग्य मंत्रालयाचं सर्व राज्यांना पत्र
आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना पत्र लिहिलं आहे.
नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढताना दिसतेय. त्यासोबतच ओमायक्रॉनचा संसर्ग वाढल्याचं चित्र आहे. गेल्या 24 तासांमध्ये संपूर्ण देशभरात 27,553 नवीन प्रकरणं समोर आली आहेत. शिवाय 284 रूग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सध्याच्या घडीला देशात 1,22,801 एक्टिव्ह रूग्ण आहेत. तर ओमायक्रॉनचा संसर्ग झालेल्या रूग्णांची संख्या 1525 वर गेली आहे. यामुळे आरोग्य विभागाची चिंता पुन्हा एकदा वाढली आहे.
दरम्यान, आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात आरोग्य मंत्रालयाने म्हटलंय की, कोरोना आणि ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ झाल्यामुळे आगामी काळात आरोग्य सेवांमध्ये अडचणी येऊ शकतात. त्यामुळे स्थलांतरित रूग्णालयं बनवण्याच्या सूचना मंत्रालयाने दिल्या आहेत. यासोबतच जिल्हास्तरावर पाळत ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची वाढ
राज्यात पुन्हा एकदा कोरोनाग्रस्तांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शनिवारी राज्यात 9 हजार 170 नवीन रूग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तर दिवसभरात 7 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर 6 ओमायक्रॉन रूग्ण आढळून आले आहेत. पुणे ग्रामीणमध्ये 3, पिंपरी-चिंचवडमध्ये 2 तर पुणे महापालिका हद्दीत एक रूग्ण आढळून आला आहे. त्यामुळे राज्यातील ओमायक्रॉन रूग्णांची संख्या 460वर जाऊन पोहचली आहे.