RT-PCR चाचणीद्वारे ओळखला जाणार ओमायक्रॉन!
केंद्र सरकारने आज दिलासादायक बातमी दिली आहे.
दिल्ली : Omicron प्रकाराबाबत जगातील अनेक देशातील लोक घाबरले असताना केंद्र सरकारने आज दिलासादायक बातमी दिली आहे. आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी राज्यसभेत सांगितलं की, जगातील 14 देशांमध्ये नवा कोरोना व्हेरिएंट आढळून आला आहे. परंतु आतापर्यंत भारतात एकही रुग्ण आढळलेला नाही.
यासंदर्भात एक अॅडव्हायझरी जारी करण्यात आली आहे, जर काही संशयास्पद प्रकरण आढळले तर त्याची त्वरित चौकशी केली जातेय आहे आणि जीनोम सिक्वेन्सिंग देखील केलं जातंय. मात्र, याबाबत राज्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. अनेक राज्यांच्या सरकारांनीही खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत.
कर्नाटकात जीनोम सिक्वेन्सिंगसाठी नमुने पाठवले
कर्नाटक सरकारनेही ओमिक्रॉन व्हेरिएंट सावधगिरी दाखवली आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले की, कोविड-19 चे नवीन प्रकार ओमिक्रॉन पाहता आम्ही परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहोत. व्हेरिएंटची पुष्टी करण्यासाठी आम्ही जीनोम सिक्वेन्सिंगसाठी काही नमुने पाठवले आहेत.
शक्य ती सर्व पावले उचलणार: वीणा जॉर्ज
Omicron प्रकाराबाबत केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितलं की, आम्ही सध्याच्या परिस्थितीवर चर्चा करू आणि शक्य ती सर्व पावले उचलू. आम्ही केंद्र सरकारला 18 वर्षांखालील लोकांसाठी लसीकरण सुरू करण्याची विनंती केली आहे. आम्ही त्यांना बूस्टर डोस देखील देण्यास सांगितलं आहे. आम्ही अजूनही निर्णयाची वाट पाहत आहोत.
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले की, ओमिक्रॉन प्रकार RT-PCR आणि RAT चाचण्यांद्वारे ओळखला जाऊ शकतो. भूषण यांनी राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना पुरेशा पायाभूत सुविधांची खात्री करण्यास आणि होम आयसोलेशनवर लक्ष ठेवण्यास सांगितलं आहे.