Childs Dental Health In Marathi: मुलं मोठी होत असताना पालकांकडून त्यांच्याकडे विशेष लक्ष ठेवले जाते. त्यांचे पालन पोषण त्यांना शिस्त लावणे, अशा गोष्टी पालकांकडून केल्या जातात. मुलांच्या वाढत्या वयात त्यांच्या आहाराकडेही पालक जास्त लक्ष देतात. मुलांच्या वाढीसाठी योग्य पोषण मिळावे व त्यासाठी काय करावे हे सगळं आई-वडील आवर्जुन करतात. पण या सगळ्यात एक गोष्ट दुर्लक्षित राहते ती म्हणजे लहान मुलांच्या दातांचे आरोग्य. मुलांना दुधाचे दात असतानाच काळजी घेण्याची गरज आहे. आज आम्ही तुम्हाला लहान मुलांच्या दातांची काळजी कशी घ्यायची, याबाबत माहिती देणार आहोत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लहान मुलांची वाढ येत असतानाच त्यांना दुधाचे दात येतात. दात येत असताना मुलं चिडचिड करतात. कधीकधी मुलांना ताप येतो त्यांचे पोट खराब होते. त्यामुळं मुलांच्या या काळात आई-बाबांनी विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. पण त्याचबरोबर दुधाचे दात येत असताना दाताच्या स्वच्छतेकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. कारण दूधाच्या दातांकडे दुर्लक्ष झाल्यास त्याच्यामुळं हिरड्यांना व दातांच्या मुळांनादेखील संसर्ग होतो. त्याचा परिणाम दुसरे दात येत असताना त्यावर होतो. त्यामुळं मुलांचे दुधाचे दात येत असतानाच त्यांच्या दातांची योग्य निगा राखावी, जाणून कशी ते. 


दुधाचे दात कधी येतात


लहान मुलांना साधारण 6 ते 10 महिन्यांच्या अंतराने दुधाचे दात येण्यास सुरुवात होते. काही मुलांचे दात तान महिन्यांतही येण्यास सुरु होतात. तर, काही मुलांचे दात येण्यास एक वर्षांपर्यंतचा वेळ जातो. प्रत्येक मुलांचे दात येण्याचे वय वेगवेगळे असू शकते. सगळ्यात पहिले मधले दात येण्यास सुरुवात होते. त्यानंतर एक एक असे सगळे दात येतात. त्यानंतर तीन वर्षांपर्यंत 20 दात येतात. वयाच्या 6 ते 20 वर्षांपर्यंत दूधाचे दात पडून पक्के दात पूर्णपणे येतात. 


मुलांच्या दाताची निगा कशी राखाल?


लहान मुलांचा पहिला दात आल्यानंतरच डेंटल केअर घेणे सुरू करा. बाळाला तीन महिने पूर्ण झाल्यानंतर एक सुती कपडा घेऊन तो थोडा ओला करा व बाळाच्या हिरड्या हलक्या हाताने स्वच्छ करा. दिवसातून दोनदा ही पद्धत वापरा. बाळाला पहिला दात आल्यानंतर एक सॉफ्ट Infant टुथब्रशने साफ करा. हा टुथब्रश खासकरुन दोन वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांसाठी बनवण्यात आला आहे. बाळ 18 महिन्यांचे होईपर्यंत टुथब्रशला फक्त पाणी लावूनच दात साफ करा. 


दात कसे साफ करावेत


बाळाला अशा स्थितीत बसवा की तुम्ही त्याचे दात तुम्ही पाहू शकता. तुमच्या हाताने बाळाची हनुवटी धरा आणि डोक्याला आपल्या शरीरावर आधार द्या. आता त्याचे ओठ उघडा आणि ब्रशला गोलाकार स्थितीत फिरवून दात हळूवारपणे स्वच्छ करा.


टुथब्रशची स्वच्छता कशी राखावी


मुलाचे दात आणि हिरड्या स्वच्छ केल्यानंतर नळाच्या पाण्याने टुथब्रश स्वच्छ धुवा. त्यानंतर टुथब्रश उघड्या बॉक्समध्ये ठेवा जेणेकरुन तो व्यवस्थित सुकेल. दर तीन ते चार महिन्यांनी टुथब्रश बदलत राहा.


दात स्वच्छ केल्यानंतरही दातांना किड लागू शकते. त्यामुळं बाळाला योग्य आहार देणेही महत्त्वाचे आहे. 0 ते ६ महिन्यांपर्यंतच्या मुलाला फक्त आईचे दूध द्यावे. त्यानंतर बाळाला पाणी व द्रव्य स्वरुपातील आहार देऊ शकता. तसंच, मुलांच्या दातांमध्ये जंत होऊ नये म्हणून त्याला गोड पदार्थ देणे टाळा. तसंच, ज्यामध्ये साखरेचे प्रमाण जास्त आहे, अशा गोष्टी खायला देणे टाळा.