हायपरटेन्शनग्रस्त रूग्णांनी या गोष्टींचं अवश्य पालन करावं
हायपरटेन्शन म्हणजेच उच्चरक्तदाब हा फार गंभीर त्रास मानला जातो.
मुंबई : हायपरटेन्शन म्हणजेच उच्चरक्तदाब हा फार गंभीर त्रास मानला जातो. म्हणून त्याला द सायलेंट किलर म्हणून संबोधलं जातं. कारण उच्च रक्तदाबाची लक्षणं ही बराच काळ लक्षात येत नाहीत. काहीवेळा रक्तदाब जरी वाढला तरी रूग्णाला ते जाणवत नाही. यामुळेच बऱ्याच रूग्णांना आपल्याला उच्चरक्तदाबाचा त्रास आहे हे लक्षात येत नाही.
हायपरटेन्शनच्या रूग्णांमध्ये डोकेदुखी, कमी झोप, चक्कर येणं, एकाग्रतेची कमी अशा प्रकारची लक्षणं आढळून येतात. काहींना जोपर्यंत हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक, किंवा किडनीसंबंधी समस्या उद्भवता नाहीत तोपर्यत हायपरटेन्शनच्या आजाराची जाणीव होत नाही. यासाठीच रक्तदाबाची तपासणीही नियमितपणे करणे गरजेचं आहे.
अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या सांगण्यानुसार, दोन वर्षातून एकदा रक्तदाबाची तपासणी केली पाहिजे. सध्या उच्च रक्तदाबाची समस्या ही आजकाल बऱ्याच रूग्णांमध्ये आढळून येते. हायपरटेन्शनपासून दूर राहण्यासाठी रोजच्या जीवनशैलीत बदल करणे आवश्यक आहे.
हायपरटेन्शनला प्रतिबंध आणि त्यावर उपचार करण्यासाठी खालील गोष्टी पाळा
डाएट
हायपरटेन्शन असलेल्या रूग्णांनी शक्यतो लो-फॅट, मिठाचं प्रमाण कमी आणि जास्तीत जास्त भाज्या आणि फळं असलेला आहार घ्यावा. जास्त फॅट असणारे पदार्थ म्हणजे फ्रेंच फ्राइज, बटाट्याचे वेफर्स, बेकरीतील पदार्थ खाणं शक्यतो टाळावं. शिवाय तुमच्या डाएटमध्ये कमी फॅट असणारे किंवा फॅट नसलेलं दूध किंवा दूधाचे पदार्थ, धान्य, मासे यांचा वापर करावा.
व्यायाम
आठवड्यातील दिवस जवळपास पाऊणतास किंवा तासभार एरोबिक पद्धतीचा (aerobic exercise) व्यायाम करावा.
वजन
लठ्ठपणा म्हणजेच स्थूलता हा उच्च रक्तदाब, मधुमेह आणि हृदयरोगांना कारणीभूत ठरतो. त्यामुळे नेहमी वजन नियंत्रणात ठेवणं गरजेचं आहे. योग्य प्रकारचा व्यायाम आणि योग्य प्रकारचं डाएट ककेल्याने वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.
ताणतणाव
ताणतणाव यामुळे देखील उच्च रक्तदाबाच्या समस्येत वाढ होते. यासाठी तणावार नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. यासाठी गरज असल्यास तज्ज्ञांच्या सल्ल्याची मदत घ्या.
मद्यपान आणि धुम्रपान
अतिप्रमाणात मद्यापान केल्याने हायपरटेन्शचा धोका वाढतो. त्यामुळे शक्यतो मद्यसेवन करणं टाळावं. त्याचसोबत धुम्रपानामुळे हायपरटेन्शन सोबतच इतर अनेक प्रकारचे आजार जडतात. त्यामुळे धुम्रपान करू नये.