मुलींनो `या` वयापूर्वी मासिक पाळी येत असेल तर सावधान! बळावते अनेक शारीरिक व्याधींची शक्यता
Periods at early age: मुली वयात आल्या अर्थात वयाच्या अमुक एका टप्प्यावर पोहोचल्या असता त्यांना मासिक पाळी येते आणि त्यांच्या शरीरात अनेक बदल घडतात.
Periods at early age: काही वर्षांपूर्वी मासिक पाळी किंवा तत्सम गोष्टींबद्दल मोकळेपणानं बोललं जात नव्हतं. आजही अनेकांसाठी हा विषय न्यूनगंडाचा असला तरीही त्यावर खुलेपणानं बोलणारा आणि विचार मांडणारा एक मोठा वर्गसुद्धा तयार झाला आहे हे नाकारता येत नाही. सहसा मुली 11 ते 15 वर्षांच्या वयाच्या टप्प्यामध्ये आल्या असता त्यांच्या शरीरात काही महत्त्वाचे बदल घडण्यास सुरुवात होते. मासिक पाळी, हा त्यातलाच एक बदल.
मुलींना पहिल्यांदाच मासिक पाळी येण्याचं वय साधारण 11 ते 15 वर्षे इतकं असतं. पण, नुकत्याच एका अहवालातून मासिक पाळीसंदर्भातील अशी माहिती समोर आली आहे ज्यामुळं चिंता काहीशी वाढली आहे. बीएमजे न्यूट्रिशन प्रिवेंशन एंड हेल्थ जर्नलमध्ये 5 डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका निरीक्षणानुसार कमी वयातच पाळीला सुरुवात झाल्यास पुढे जाऊन या मुली/ महिलांना मधुमेहाचा (diabetes) धोका असतो. (Menstruation at an early age)
निरीक्षणातून नेमकं काय समोर आलं?
1999 ते 2018 दरम्यानच्या काळात 20 ते 65 वर्षे वयोगटातील जवळपास 17300 हून अधिक मुली आणि महिलांकडून माहिती घेत हे संशोधन करण्यात आलं. ज्यामध्ये या महिलांना पाळी सुरु होण्याच्या वयानुसार वेगवेगळ्या गटांमध्ये विभागण्यात आलं. यामध्ये 10, 11, 12,13,14, 15 आणि त्याहून जास्त वयोगटांचा समावेश होता.
बीएमजे न्यूट्रिशन प्रिवेंशन एंड हेल्थ जर्नलमध्ये या निरीक्षणपर अभ्यासाचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. ज्यामध्ये कमी वयात मासिक पाळी आलेल्या महिलांना 65 व्या वर्षाआधीपासूनच स्ट्रोकचा धोका संभवत असल्याचं सांगिलं. यामध्ये 10 वर्षांहून कमी वयात आलेल्या महिलांचा समावेश होता.
ज्या महिलांची मासिक पाळी 10 वर्षे किंवा त्याहून कमी वयात सुरु झाली आहे त्यांना टाइप टू डायबिटीजचा 32 टक्के धोका असल्याचं स्पष्ट झालं. तर, हेच प्रमाण 11 व्या वर्षी मासिक पाळी आलेल्यांमध्ये 14 टक्के आणि 12 व्या वर्षी मासिक पाळी आलेल्यांमध्ये 29 टक्के इतकं होतं. पण, या महिलांमध्ये कार्डियोवॅस्कुलर आजारपणांचा धोका मात्र कमीच होता, असंही निरीक्षणातून समोर आलं.
हेसुद्धा वाचा : मुलांच्या अपुऱ्या झोपेला फक्त शाळेची वेळ जबाबदार आहे का? 'या' 5 कारणांचा नक्की विचार करा
ल्युइसियानामध्ये तुलाने यूनिवर्सिटीच्या अहवालात 1773 महिलांना टाईप 2 डायबिटीज असल्याची माहिती समोर आली असून, त्यातील 205 महिलांना हृदयविकाराच्याही समस्या होत्या. यामध्ये त्या महिलांचा समावेश होता ज्यांची मासिक पाळी 13 वर्षांहून कमी वयात सुरु झाली होती. दरम्यान, बीएमजेमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या निरीक्षणपर अहवालानुसार मासिक पाळी कमी वयात सुरु झाल्यास मेनोपॉज येईपर्यंत शरीर दीर्घ काळासाठी अॅस्ट्रोजनच्या संपर्कात राहतं. ज्यामुळं या समस्या बळावतात.
नॉट्रे डेम ऑस्ट्रेलिया यूनिवर्सिटीतील तज्ज्ञांच्या मते निरीक्षणातून समोर आलेली माहिती फारशी आश्चर्यकारक नाही. प्यूबर्टीच्या सुरुवातीचा थेट संबंध वजन आणि बीएमआय अर्थात बॉडी मास इंडेक्स आणि लॅप्टिन हार्मोन्सशी संबंधित असतो. अशा परिस्थितीमध्ये जेव्हा त्या मुलींचं वजन वाढतं तेव्हा लॅप्टीनचंही प्रमाण वाढतं आणि कमी वयातच मुलींच्या शरीरात अनेक बदल होऊ लागतात.