मुंबई : उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत आहे. याचा त्रास सगळ्यांनाच होत आहे. मात्र मधुमेहींना या उन्हाळ्याचा त्रास अधिक होतो. या सगळ्यात मधुमेह असलेल्या रुग्णांनी उन्हाळ्याच्या दिवसात कोणती विशेष काळजी घ्यायला हवी किंवा त्यांना या दिवसात काही विशेष त्रास संभवतात का? त्याविषयी आपण थोडंसं जाणून घेणार आहोत. मधुमेह एका मर्यादेत असला, तर तो रुग्णाच्या अगदीच जीवावर बेतत नाही. पण जर कोणत्याही कारणाने ही मर्यादा ओलांडली गेली, तर मात्र आरोग्याच्या बाबतीत भलतीच गुंतागुंत होऊन रुग्णाचा जीव धोक्यात येऊ शकतो.अशा वेळी मधुमेहींनी तहान भागवण्यासाठी या पेयांचा वापर करावा. 


1) सब्जाच्या बियांमध्ये ओमेगा-


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

३ फॅटी अॅसिड्स असतात. या बिया आपल्या वजनाच्या ९ ते १० पट पाणी शोषून घेतात त्यामुळे हायड्रेशनसाठी त्यांचा उपयोग होतो. 


साहित्य - २ कप पाणी, १.५ चमचा सब्जाच्या बिया, अर्धा चमचा लिंबाचा रस, शुगरफ्री स्वीटनर (गोड चवीसाठी घालण्यात येणारा पदार्थ).


कृती - सब्जाच्या बिया आणि पाणी एका जार किंवा ग्लासमध्ये ओता आणि चांगले ढवळून घ्या. १० मिनिटे थांबा, जेणेकरून सब्जाच्या बिया पाणी शोषून घेतील. त्यात लिंबाचा रस आणि चवीनुसार स्वीटनर घाला. एकजीव होण्यासाठी चांगले ढवळून घ्या. 


2)  जामून स्मूथी -


जांभळामधील जांबोलिन या एंझाइममुळे शरीरातील ग्लुकोजचा वापर अधिक चांगल्या प्रकारे होतो आणि शरीरातील ग्लुकोजच्या पातळीचे प्रमाण नियंत्रित राहते.


साहित्य - पाऊण कप बिया काढलेला जांभळांचा गर, २ कप दही, १ टेबलस्पून शुगर सब्स्टिट्यूट, ४ टेबलस्पून बर्फाचा चुरा.


कृती - सर्व घटक (बर्फ सोडून) मिक्सरमध्ये फेस येईपर्यंत एकत्र करून घ्या. हा स्मूथी चार छोट्या ग्लासांमध्ये ओता आणि प्रत्येक ग्लासमध्ये एक टेबलस्पून बर्फ घाला.


3)  लिंबू सरबत -


एक ग्लास थंड पाण्यात लिंबू आणि शुगरफ्री स्वीटनर घाला. हे सरबत अजून चटकदार करण्यासाठी आलं आणि पुदिना त्यात घाला. 


4)  वॉटरमेलन चिलर -


२ कप बिया नसलेला कलिंगडाचा गर, अर्धा कप डाळींबाचे दाणे, २ टेबलस्पून लिंबाचा रस, एक पुदिन्याचे पान. 


कृती - सर्व घटक ब्लेंडरमध्ये एकत्र करून घ्या. बर्फाच्या खड्यांवर ते ओता आणि त्यावर अजून एक पुदिन्याचे पान ठेवून सजवा.


5)  वॉटरमेलन जामून समर कूलर -


२ कप बिया नसलेले कलिंगडाचे काप, १ कप बिया काढलेली जांभळे, पुदिन्याची १० पाने, बर्फाचे ४ तुकडे.


कृती - सर्व घटक मिक्सरमध्ये घालून एकजीव करून घ्या. हे पेय चार ग्लासमध्ये ओता. एक तास फ्रिजमध्ये ठेवा आणि मग प्यायला द्या.