मुंबई : कोरोना व्हायरसच्या नवीन व्हेरिएंटमुळे जगभरातील देशांची चिंता वाढली आहे. बर्‍याच देशांनी नवीन व्हेरिएंटमुळे प्रभावित देशांच्या फ्लाइटवर बंदी घातली आहे. तर काहींनी या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी अलग ठेवणं अनिवार्य केलं आहे. आता भारतातही सरकारकडून कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटपासून संरक्षण करण्यासाठी कठोर पावलं उचलण्याची मागणी होऊ लागली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी केली आहे की, कोरोनाच्या नवीन प्रकारामुळे प्रभावित झालेल्या देशांच्या फ्लाइटवर बंदी घालावी. ज्या देशांना कोरोनाच्या या नवीन व्हेरिएंटसचा फटका बसला आहे, त्या देशांमध्ये प्रवास करण्यास बंदी घालण्यात यावी.


मुंबईत आल्यावर क्वारंटाईन केलं जाणार


मुंबई महापालिकाही कोरोनाच्या मुद्द्यावर सक्रिय झाली आहे. मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, जे दक्षिण आफ्रिकेतून येत आहेत त्यांना क्वारंटाईन केलं जाईल. त्याचप्रमाणे व्हायरस आढळल्यानंतर जीनोम सिक्वेन्सिंग केलं जाईल. 


दरम्यान दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या नव्या व्हेरिएंटबाबत मुंबई महापालिकेने आज सायंकाळी 5.30 वाजता अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. 


मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर पुढे म्हणाल्या की, नाताळचा सण येत असून जगभरातून लोकं आपल्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी मुंबईत येतात. बीएमसी पूर्ण खबरदारी घेत आहे. हे नवीन प्रकार अनेक देशांमध्ये चिंतेचं कारण बनले आहे. त्यामुळे आम्ही तयार आहोत. त्या म्हणाल्या की, लोकांनी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावे आणि फेस मास्क वापरावा.