खाण्या-पिण्यााच्या वस्तूंवर सॅनिटायजरचा वापर करत असाल, तर हे वाचाच
जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार...
नवी दिल्ली : कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी सॅनिटायजरचा वापर करत असाल तर काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. कोरोना काळात सध्या लोक मोठ्या समस्येला सामोरे जात असून काहीसं भीतीचं वातावरण आहे. कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे अनेक लोक वारंवार सॅनिटायजर लिक्विडचा वापर करतात. सॅनिटायजरने हात सॅनिटाईज करणं योग्य आहे. परंतु अनेक जण हाताला सॅनिटाईज करण्याऐवजी, सरळ भाज्या, फळं आणि खाण्या-पिण्याच्या वस्तूंनाही सॅनिटाईज करत आहेत. पण असं करणं हानिकारक ठरु शकतं.
सॅनिटायजरचा खाण्या-पिण्याच्या वस्तूंवर थेट वापर करण्याने आरोग्यासंबंधी मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, सॅनिटाजरचा वापर केवळ हात आणि धातूपासून बनवलेल्या गोष्टींना सॅनिटाईज करण्यासाठी होऊ शकतो.
बाहेरुन मागवलेले, ऑर्डर केलेले पदार्थ हानिकारक असल्याचा काहींचा समज आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अमेरिकेत खाण्याच्या पदार्थांमध्ये ब्लीच टाकून खाल्याची माहिती समोर आली होती. असं केल्याने व्हायरस संपुष्टात येईल असं त्यांना वाटत होतं. परंतु असं करणं हानिकारक ठरु शकतं. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, एकदा एकदा अन्न शिजल्यानंतर त्यात कोणताही धोका नाही. त्यामुळे खाण्या-पिण्याच्या वस्तूंना सॅनिटाईज करत असाल तर सावध व्हा. खाताना हात सॅनिटाईज करा परंतु खाण्याच्या वस्तूंवर त्याचा वापर टाळा.