मुंबई : कोरोनातून मुक्त झाल्यानंतर देखील रूग्णांना इतर त्रास सतावू लागले आहेत. यामध्ये म्युकरमायकोसिस तसंच काही प्रकारच्या फंगसचा समावेश आहे. तर आता यामध्ये अजून एका समस्येची भर पडली असून तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, ही फार गंभीर समस्या आहे. यामध्ये रूग्णाची हाडं गळू लागतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या समस्येचं नाव एवैस्कुलर नेक्रोसिस म्हणजेच बोन डेथ असून याची प्रकरणं आढळून येत आहेत. ही एक अशी मेडिकल कंडीशन आहे ज्यामध्ये व्यक्तीची शरीरातील हाडं गळू लागतात. त्यामुळे आता कोरोनानंतर बोन डेथचा धोका असून याची प्रकरणं वाढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


एव्हॅस्कुलर नेक्रॉसिस याला डेथ ऑफ बोन टिश्युज म्हटलं जातं. मुंबईतील 40 वर्षांहून कमी वय असलेल्या तीन रुग्णांमध्ये ही समस्या दिसून आली आहे. कोरोनावर उपचार घेतल्यानंतर 2 महिन्यांनी एव्हॅस्कुलर नेक्रॉसिसची लक्षणं दिसलेल्या 40 वर्षांखालील 3 रुग्णांवर माहिममधील हिंदुजा हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी उपचार सुरु असल्याची माहिती आहे.


‘एव्हॅस्कुलर नेक्रॉसिस अॅस अ पार्ट ऑफ लाँग कोविड-19 ’ हा रिसर्च पेपर मेडिकल जर्नल ‘BMJ Case Studies’ मध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अभ्यानुसार, कोरोना होऊन गेलेल्या रूग्णांमध्ये दोन प्रकारे ट्रेंड दिसून येत आहेत. 


यामध्ये एक म्हणजे कोरोना झालेला असताना रूग्णांना corticosteroid prednisolone या स्टिरॉइडचा 758mg चा डोस दिला जातो. हाच डोस 2000mg इतका दिला गेला तर शरीरात एव्हीएनची समस्या निर्माण होऊ शकते. याशिवाय इतक्या कमी डोसमध्ये एव्हीएनची लक्षणं दिसणं ही एक चिंतेची बाब मानली जाते.


तर दुसरी गोष्ट म्हणजे साधारणपणे स्टेरॉइड्स घेतल्यानंतर सहा महिने ते एका वर्षात एव्हीनए विकसित होतो. मात तो कोरोनाच्या रूग्णांमध्ये फार लवकर विकसित होताना दिसतोय.


काय आहे एव्हॅस्कुलर नेक्रॉसिस?


एव्हॅस्कुलर नेक्रॉसिस हा एक आजार आहे ज्यामध्ये हाडांपर्यंत पोहोचणारं रक्त कायम किंवा तात्पुरत्या स्वरूपात बंद होतो. रक्तपुरवठा खंडित झाल्यामुळे, हाडांच्या ऊती मरतात आणि हाडांचं विघटन करण्यास सुरवात करतात.