खळबळजनक! सांडपाणीही निघालं कोरोना पॉझिटीव्ह
सांडपाण्याचे नमुने घेऊन कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटीव्ह आली आहे.
चंदीगढ : एखाद्या व्यक्तीचे नमुने घेऊन त्याची कोरोना चाचणी केली आणि ती पॉझिटीव्ह आली तर तुम्हाला काही विशेष वाटणार नाही. मात्र सांडण्याचे नमुने घेतले आणि त्यांची कोरोना चाचणी केली तर...इतकंच नाही आणि ती चाचणी पॉझिटीव्ह आली तर? चंदीगडमध्ये पहिल्यांदाच असं करण्यात आलं आहे. याठिकाणी सांडपाण्याचे नमुने घेऊन कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटीव्ह आली आहे.
पीजीआय चंदिगडच्या विषाणूशास्त्र विभागात या सांडपाण्याच्या नमुन्यांची चाचणी करण्यात आली आहे. WHO-ICMR केंद्राने अशा तपासणीची शिफारस केली आहे. जेणेकरुन कोरोनाचा पर्यावरणावर होणारा परिणाम तपासता येईल.
PGI Chandigarh मधील प्रोफेसर मिनी पी सिंग म्हणाले, "आम्ही गेल्या डिसेंबर महिन्यापासून सांडपाणी प्रक्रिया केंद्रांमधून नमुने गोळा करण्यास सुरुवात केली. चंदीगडसह पंजाबमधील अमृतसरमध्ये वनस्पतींचेही नमुने घेण्यात आले होते. दर आठवड्याला नमुने तपासले जातायत. डिसेंबरमध्ये आमच्याकडे आलेल्या नमुन्यांमध्ये कोरोना व्हायरस आढळला नाही. पण आता संसर्ग वाढल्यानंतर चंदीगडच्या सांडपाण्यात कोरोना व्हायरस आढळून आलाय"
मिळालेल्या माहितीनुसार, सांडपाण्यात जेनेटिक मटेरियलच्या तुकड्यांद्वारे SARS-CoV-2 व्हायरस आहे का हे शोधण्यासाठी RT-PCR करण्यात आली होती.
सांडपाण्याचे नमुने तपासण्याची पद्धत वेगळी असते. मानवी नमुन्यांची चाचणी करण्याच्या तुलनेत ही प्रक्रिया वेगळी आहे. यासाठी प्रथम 2-3 मिली सांडपाणी सुमारे तीन दिवस सुरक्षित ठेवून घट्ट होण्याची वाट पाहिली जाते.
त्यानंतर त्यातील न्यूक्लिक अॅसिड काढून पाणी स्वच्छ करण्यात येतं. जेणेकरून सांडपाण्याच्या पाण्यात आढळणारे विषाणू वेगळे करता येतील. त्यानंतर हा नमुना आरटी-पीसीआर मशीनमध्ये तपासला जातो. डब्ल्यूएचओच्या म्हणण्यानुसार, एखाद्या ठिकाणच्या सांडपाण्यात कोरोना विषाणू आढळल्यास, याचा अर्थ तिथे एक किंवा अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.