फेअरनेस क्रीमचा वापर आरोग्यासाठी धोकादायक
अनेकांना स्वतःच्या त्वचेच्या रंगाचा न्यूनगंड असतो.
मुंबई : अनेकांना स्वतःच्या त्वचेच्या रंगाचा न्यूनगंड असतो. मग गोरेपणा मिळवाण्यासाठी बाजारातील अनेक क्रीम्सचा भडीमार केला जातो. मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय केवळ जाहिरातींना भूलून फेअरनेस क्रीमची निवड करणं आरोग्याला धोकादायक ठरू शकते. फेअरनेस क्रीमचेही साईड इफेक्ट्स असू शकतात हे अनेकांना ठाऊकच नसते.
बाजारात सौंदर्यप्रसाधनं लॉन्च करण्यापूर्वी अनेक टेस्टमधून जावं लागतं. अनेकदा क्रीममध्ये पारा मिसळला जातो. याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. WHO ने दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक 4पैकी 3 महिला डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ब्लिचिंग करण्याचा निर्णय घेतात.
अनेक समस्यावर उपचार
चेहर्यावरील डाग, त्वचेच्या रंगामध्ये अनियमितता असणं, त्वचेवर अकाली सुरकुत्या येणं असे दोष लपवण्यासाठी फेअरनेस क्रीमचा वापर केला जातो. समान्यपणे क्रीममध्ये दोन प्रकारचे ब्लिचिंग एजेंट असतात. हाइड्रोक्विनोन आणि कॉर्टिकोस्टेरॉइड्स हे घटक आढळतात.
त्वचा तज्ञांच्या सल्ल्यानुसार, क्रीममध्ये हाइड्रोक्विनोनचं प्रमाण 4%पेक्षा कमी असणं आवश्यक आहे. त्वचेवर खाज येत असल्यास अनेकदा कॉर्टिकोस्टेरॉइड्स किंवा टॉपिकल स्टेरॉइड्स दिली जाते. मात्र त्वचेचा त्रास नसणारेदेखील अनेक रूग्ण त्याचा वापर करतात.
क्रीम त्वचेला त्रासदायक ठरू शकते
ज्या क्रीममध्ये हाइड्रोक्विनोन घटक असतात, अशा क्रीम्स दिवसातून 2 वेळेपेक्षा अधिक लावू नका. अशा क्रीम्स चेहर्यावर लावू नयेत. तसेच 8-12 आठवड्यांपेक्षा अधिक दिवस लावू नका.
कॉर्टिकोस्टेरॉइड्स असणारी क्रीम नाजूक भागांवर लावली जाऊ शकते. प्रामुख्याने खाज कमी करण्यासाठी सुचवल्या जाणार्या क्रीममध्ये त्याचा वापर केला जातो. मात्र त्यासोबत कोण-कोणते घटक मिसळले आहेत हे पाहणं गरजेचे आहे.
क्रीमचे साईडइफेक्ट्स
नॅशनल हेल्थ सर्विसच्या अहवालानुसार ब्लिचिंग एजंटच्या चूकीच्या वापरामुळे अनेक दुष्परिणाम दिसतात. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, यामुळे त्वचेवर सूज, त्वचेवर डाग पडणं, जळजळ वाढणं असे दुष्परिणाम आढळतात. अतिवापरामुळे त्वचा पातळ होते, शरीरात नसा थेट दिसतात. यकृत, किडनीवरही त्याचा परिणाम होतो. प्रामुख्याने गरोदरपणाच्या काळात चूकीच्या क्रीम्सचा वापर केल्यास बाळावरही त्याचा परिणाम होऊ शकतो.
म्हणूनच त्वचा उजळवण्याच्या नादात अति प्रमाणात आणि चूकीच्या क्रीम्सचा वापर करणं आरोग्यावर गंभीर परिणाम करते.