Virtual Autism: मोबाइलचं व्यसन मुलांच्या बुद्धिवर करतंय परिणाम, उशीर होण्याआधीच काळजी घ्या
Side Effects of Mobile Addicton: मोबाइल फोन, टीव्ही, टॅबलेट, संगणक यासारख्या इलेक्ट्रॉनिक गॅजेट्समुळे लहान मुलं व्हर्च्युअल ऑटिजमचे (Virtual Autism) बळी ठरत आहेत. एका रिपोर्टनुसार, या मुलांमध्ये ऑटिजमचा आजार वाढत आहे. यामुळे त्यांच्या सामाजिक संवाद आणि वागणुकीच्या कौशल्यावर परिणाम होत आहेत.
Side Effects of Mobile Addicton: लहान मूल रडत असेल तर त्याला शांत करण्यासाठी पालक अनेकदा त्याला टीव्ही लावून देतात किंवा मग हातात मोबाइल किंवा इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू सोपवतात. यामुळे मूल शांत होतं पण त्याचे डोळे एकटक त्या मोबाइलकडे लागलेले असतात. मुलांना शांत करण्याच्या किंवा एका ठिकाणी बसवण्याच्या नादात पालकांना आपण त्यांची स्क्रीन टाइम वाढवत आहोत हे समजत नाही. सतत मोबाइल हाताळल्याने मुलांच्या मानसिक विकासावर याचा परिणाम होते हे जगभरातील अनेक अभ्यासातून समोर आलं आहे. इतकंच नाही, तर मोबाइल. गॅजेट्स किंवा टीव्ही पाहण्याचं व्यसन मुलांचं भवितव्य धोक्यात टाकत असतं. मुलांमध्ये यामुळे व्हर्च्युअल ऑटिजमचा (Virtual Autism) धोका वाढत असतो.
Virtual Autism म्हणजे काय?
खासकरुन चार ते पाच वर्ष वयाच्या मुलांमध्ये Virtual Autism ची लक्षणं दिसत असतात. मोबाइल, टीव्ही, संगणक किंवा इतर इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सचं व्यसन यामागील मूळ कारण असतं. स्मार्टफोनवर अधिकाधिक वेळ घालवल्याने, लॅपटॉप आणि टीव्हीचा जास्तीत जास्त वापर यामुळे लहान मुलांना बोलताना समस्या जाणवते. तसंच दुसऱ्या लोकांशी सहजपणे संवाद साधताना त्यांना अडथळा येतो.
दिल्लीच्या बीएलके मॅक्स हॉस्पिटलच्या पीडियाट्रिशियन डॉक्टर रजनी फरमानिया यांनी 'आज तक'शी बोलताना सांगितलं आहे की "या स्थितीला आम्ही Virtual Autism म्हणतो. म्हणजे याचा अर्थ त्या मुलांमध्ये Autism नसतो, पण त्यांच्यात लक्षणं दिसत असतात. 1 ते 3 वर्षांच्या मुलांना याचा सर्वाधिक धोका असतो. आजच्या जमान्यात तर मुलं चालायला सुरुवात केल्यानंतर लगेचच मोबाइलच्या संपर्कात येतात. सव्वा वर्षाच्या मुलांपासून ते 3 वर्षांच्या मुलांमध्ये हा प्रकार जास्त असतो. अनेकदा आई-वडिलांना आपण मुलांना या माध्यमातून A, B, C, D शिकवत आहोत असं वाटतं. पण ते मुलांना या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचं व्यसन लावत असतात".
त्यांनी पुढे सांगितलं की "याचा नकारात्मक प्रभाव असा होतो की, ते बोलताना अडखळतात. त्यांच्या बोलण्याचा पूर्णपणे विकास होत नाही. ते सतत गॅजेट्समध्ये व्यग्र राहतात. त्यांच्या रोजच्या वागण्यातही बदल दिसू लागतात. ते अनेक गोष्टीत चिडचिड करु लागतात. अनेकदा ते एखादी गोष्ट नाही मिळाली तर आक्रमक होतात. अनेकदा आई-वडील रात्रीच्या वेळी मुलांच्या हातात मोबाइल देत असल्याने याचा परिणाम त्यांच्या झोपेवरही होतो. त्यांच्या झोपेच्या वेळा सतत बदलत राहतात. त्यामुळे आई-वडिलांनीही रात्रीच्या वेळी मोबाइल, टीव्ही पाहणं बंद करावं. त्यांना पाहून मुलंही हट्ट करतात आणि आपली एकाग्रता गमावतात".
मग उपाय काय?
मग यावर उपाय काय असं विचारलं असता डॉक्टर रजनी सांगतात की "सर्वात आधी मुलांना मोबाइल आणि टीव्हीपासून दूर करा. त्यांचा स्क्रीन टाइम कमी करा आणि स्लीप पॅटर्नमध्ये सुधारणा करा". करोनामुळे मुलांचे मैदानी खेळ कमी झाली असून त्यांना मोबाइलचं व्यसन लागलं आहे. पण मुलांना रोखण्याआधी आई-वडिलांनीही आपल्या वागण्यात बदल करण्याची गरज आहे. मुलं अनेकदा आई-वडिलांकडे पाहूनच अनेक गोष्टी शिकत असतात असंही त्यांनी सांगितलं आहे.
एका रिपोर्टनुसार, बिहार आणि देशभरात Virtual Autism प्रकरणांची संख्या गेल्या एक दशकात 3 ते 4 टक्क्यांनी वाढली आहे. यामागे अनुवंशिक कारणही आहे. पण लहान मुलांमध्ये मोबाइल फोनचा वाढलेला वापरही एक कारण ठरत आहे.
Virtual Autism ची लक्षणं काय आहेत?
Virtual Autism पीडित मुलं दुसऱ्या मुलांशी बोलताना अडखळतात, ते डोळ्यात डोळे घालून बोलताना घाबरतात तसंच संवादात विकास होण्यास उशीर लागतो. तसंच त्यांना लोकांमध्ये मिसळण्याची इच्छा होत नाही. याशिवाय त्यांचा आयक्यूही कमी होतो.
तुमच्या मुलांमध्ये ही लक्षणं दिसत असल्यास घाबरण्याची गरज नाही. मुलांमधील या समस्या स्विकारत त्यांची अतिरिक्त काळजी आणि उपचार द्या. थेरेपीच्या माध्यमातून आई-वडील मुलांना चांगल्या पद्धतीने समजू शकतात आणि ठीक होण्यास मदत करु शकतात.