धुम्रपानाचा त्रास केवळ तुम्हालाच नाही तर पुढच्या पिढ्यांना होतोय, कसा जाणून घ्या
जगभरात पहिल्यांदाच असा अभ्यास करण्यात आलाय ज्यामध्ये धूम्रपानाचा प्रभाव किती पिढ्यांपर्यंत राहतो हे समोर आले आहे.
मुंबई : Puberty म्हणजे तारुण्य सुरू होण्यापूर्वी कोणी धूम्रपान केलं तर त्याचा फटका पुढच्या चार पिढ्यांना बसण्याची शक्यता आहे. जगभरात पहिल्यांदाच असा अभ्यास करण्यात आलाय ज्यामध्ये धूम्रपानाचा प्रभाव किती पिढ्यांपर्यंत राहतो हे समोर आले आहे. याला ट्रान्सजनरेशनल इफेक्ट असं म्हटलं जातं.
जर तुम्ही वयाच्या 13 व्या वर्षी धुम्रपान करण्यास सुरुवात केली असेल तर तुमची नातवंडं किंवा त्यांच्या मुलांवरही याचा प्रभाव दिसून येऊ शकतो. नुकताच सायंटिफिक रिपोर्ट्स जर्नलमध्ये एक अभ्यास प्रकाशित करण्यात आला आहे. अभ्यासात, संशोधकांनी असं म्हटलंय की, त्यांनी बायोमार्कर वापरून ही माहिती मिळवली आहे.
धुम्रपान आणि खराब वातावरणाचा परिणाम लठ्ठपणा, फुफ्फुस, हृदय, मेंदूशी संबंधित आजारांना होतो. आणि हे आजा पिढ्यानपिढ्या पुढे जात राहतात.
मूल पोटात असताना सिगारेट ओढल्याने पुढील अनेक पिढ्यांमध्ये आजार पसरण्याची शक्यता आहे. यामुळे गर्भाचा अचानक मृत्यूही होऊ शकतो. त्याचप्रमाणे मूल जन्माला आलं तर त्याला ऑटिझमची समस्या असण्याची शक्यता आहे.
ब्रिस्टल युनिवर्सिटीतील संशोधकांनी 90 च्या दशकातील मुलांचा अभ्यास केला. त्यांनी एव्हॉन काउंटीमध्ये 90 च्या दशकात जन्मलेल्या 14,000 लोकांचा डेटा गोळा केला. यांच्यावर केलेल्या अभ्यासामधून असं दिसून आलं की, सिगारेट ओढण्याचे परिणाम चार पिढ्यांपर्यंत दिसून येतात.
यासंदर्भात रिपोर्ट तयार करणारे प्रोफेसर जीन गोल्डींग सांगतात की, आम्हाला दोन महत्त्वाचे परिणाम दिसून आले आहेत. प्रथम, सिगारेटचं रसायन प्युबर्टीपूर्वी मुलाच्या शरीरात आढळलं तर ते पिढ्यान्-पिढ्या राहतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुलांमध्ये लठ्ठपणाची समस्या त्यांच्या आहारामुळे किंवा शारिरीक हालचाल कमी झाल्यामुळे होत नाही. तर यामागे पूर्वजांची जीवनशैली हे मोठं कारण आहे.