Stress and Pregnancy Side Effects: तणाव जोडप्याच्या कुटुंब नियोजनावर परिणाम करते. गर्भधारणेदरम्यान असलेला तणाव आणि नैराश्य हे आई आणि बाळासाठी चिंताजनक ठरु शकते. कौटुंबिक किंवा गर्भधारणेचे नियोजन करताना जोडप्यांनी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आणि तणावावर मात करणे गरजेचे आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 ते 40 या वयोगटातील 80 टक्के जोडप्यांना तणावामुळे गर्भधारणेसंबंधीत समस्यांना तोंड द्यावे लागते आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुटुंब नियोजन करताना संतुलित आहाराचे सेवन करणे, वजन नियंत्रित राखणे, दररोज व्यायाम करणे, योग आणि ध्यान यासारख्या विश्रांती तंत्रांचा सराव करणं, रात्री पुरेशी झोप घेणं आणि नियमित आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे. कौटुंबिक नियोजन आणि गर्भधारणेवर तणावाचा परिणाम होणार नाही याकडे लक्ष देणे आणि विचार करणे आवश्यक आहे. विविध अभ्यासांनुसार, तणावाच्या उच्च पातळीमुळे पुरुष आणि स्त्रिया या दोघांमध्येही हार्मोनल संतुलन बिघडते, ज्यामुळे त्यांची प्रजनन क्षमता खराब होते. 


गर्भधारणेदरम्यानच्या तणावामुळे मुलामध्ये मुदतपूर्व जन्म, कमी वजनाचे बाळ आणि विकासासंबंधीत समस्या उद्भवू शकतात. दीर्घकालीन ताणतणाव अनुभवणाऱ्या मातांना गर्भधारणेसंबंधीत मधुमेह आणि प्रीक्लेम्पसिया यासारख्या परिस्थितींचा धोका असू शकतो. यामुळे बाळंतपणानंतर चिंता, नैराश्य आणि प्रसुतीनंतर नैराश्याची भावना निर्माण होते. तणावामुळे मासिक पाळीत व्यत्यय येतो, ज्यामुळे जोडप्यांना गर्भधारणेत अडचणींचा सामना करावा लागतो. 


पुण्याच्या रूग्णालयातील प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. प्रिथिका शेट्टी यांनी सांगितलं की, तणावामुळे नातेसंबंधावर परिणाम होऊन कुटुंब नियोजनाच्या बाबतीत निर्णय घेण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होतो. तणावाचा सामना करणारी जोडपी निरोगी गर्भधारणेसाठी आवश्यक असलेल्या पद्धतींचे पालन करण्यात अयशस्वी ठरतात जसे की संतुलित आहार, नियमित व्यायाम किंवा रात्रीच्या वेळी चांगली झोप घेणे. कुटुंब नियोजनाच्या प्रवासात तणावाची भूमिका ओळखून तणावाची पातळी व्यवस्थापित करणे गरजेचे आहे. यामुळे यशस्वी गर्भधारणेचा प्रवास सुरळीत होतो.


पुण्यातील वंध्यत्व निवारण तज्ज्ञ डॉ. भारती ढोरे पाटील सांगतात की, जोडप्यांनी एकत्रितपणे मेडिटेशन सारख्या विश्रांती तंत्राचा सराव करून पालकत्व आणि गर्भधारणेच्या नियोजनाच्या प्रवासाला सुरुवात करावी आणि आपले आयुष्य तणावमुक्त कसे राहिल यासाठी प्रयत्न करावा. ध्यान आणि योगामुळे तणावाची पातळी कमी होते आणि जोडप्यांमधील संबंध आणखी घट्ट होतात. तुमच्या भावना, भीती आणि कौटुंबिक नियोजनाविषयीच्या अपेक्षांबद्दल खुला संवाद साधा. एकमेकांसाठी सुरक्षित जागा निर्माण करून तणाव कमी करता येऊ शकतो. जोडप्यांनी त्यांच्या आणि योणाऱ्या बाळाच्या आरोग्याबाबत जागरुक राहणे आवश्यक आहे.