कोरोना व्हायरसपासून असा करा स्वत:चा बचाव
जाणून घ्या काय आहेत कोरोना व्हायरसची लक्षण
मुंबई : कोरोना व्हायरसचा पहिला रुग्ण चीनमधील वुहान शहरात आढळला. चीनमधल्या वुहानमध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातलं असून सर्वाधिक रुग्ण येथेच आढळले आहेत. चीन सरकारकडून या व्हायरसपासून बचाव होण्यासाठी विविध पावलं उचलली जात आहेत. लोकांना मास्क लावूनच बाहेर पडण्याचं सांगण्यात आलं आहे. वुहानमधील अनेक ठिकाणी प्रवासावर निर्बंध घालण्यात आले आहेत.
काय आहेत कोरोना व्हायरसची लक्षणं -
जलद गतीने पसरणाऱ्या या व्हायरसमुळे सुरुवातीला ताप येणं, सुका खोकला, नाक गळणं त्यानंतर अशीच परिस्थिती राहिल्यास काही दिवसांनी श्वास घेण्यास त्रास होणं, थकवा येणं ही साधारण लक्षण असल्याची माहिती मिळत आहे. अधिक गंभीर प्रकरणात, न्यूमोनिया, किडनी फेल यांसारखी स्थिती देखील निर्माण होऊ शकते. या व्हायरसमुळे सर्वात आधी फुफ्फुसं प्रभावित करत असल्याचं समोर आलं आहे.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्हायरसवर अद्याप कोणताही ठोस उपाय नाही. डॉक्टर या व्हायरसचा संसर्ग झालेल्या रुग्णाला, त्याच्या लक्षणांच्या आधारेच उपचार करत आहेत.
काय काळजी घ्याल -
- साबण आणि पाण्याने हात स्वच्छ ठेवा
- शिंकताना नाक आणि तोंडावर रुमाल ठेवा
- सर्दी, ताप झालेल्यांपासून शक्यतो लांब राहा
- जंगली किंवा पाळीव प्राण्यांपासून दूर राहा
- कच्चं किंवा अर्धवट शिजवलेलं मांस खाणं टाळा
- बाहेर पडताना मास्क घाला
- खाण्या-पिण्याकडे विशेष लक्ष द्या
या व्हायरसची लक्षण दिसल्यास -
जागतिक आरोग्य संघटनेने रुग्णालय, डॉक्टर आणि आरोग्य कामगारांना विशेष सल्ला दिला आहे. संसर्ग झालेल्या व्यक्तीची त्वरित चाचणी करावी. संसर्गाच्या दृष्टीने, रुग्णाला सौम्य, मध्यम किंवा तीव्र म्हणून वर्गीकृत केले जावे.
आरोग्यसंबंधी कामगारांना या संसर्गाची लागण होऊ नये यासाठी सर्व खबरदारीच्या उपाययोजना केल्या गेल्या पाहिजेत. रुग्णालयात डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी गाऊन, मास्क, हातमोजे वापरावेत. याशिवाय रुग्णालयात संक्रमित रुग्णांना वेगळं ठेऊन, रुग्णांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. रुग्णाच्या संपर्कात आलेली मेडिकल उपकरणं संपूर्ण स्वच्छ ठेवावी, रुग्णाला तपासल्यानंतर हात स्वच्छ करावेत.
नॉटिंगम यूनिव्हर्सिटीचे वायरोलॉजिस्ट प्राध्यापक जोनाथन बॉल यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अतिशय नवीन प्रकारचा कोरोना व्हायरस आहे. हा व्हायरस प्राण्यांमधूनच, मनुष्यापर्यंत पोहचला असल्याची शक्यता असल्याचं ते म्हणाले. हा व्हायरस एका प्रजातीमधून, दुसऱ्या प्रजातीकडे संक्रमित होऊन नंतर मानवी शरीरात संक्रमित होत असल्याची शक्यता आहे.
या व्हायरसची सुरुवात चीनमधल्या वुहानमधून झाली असली तरी आता याचा संसर्ग चीनसोबतच इतर देशांमध्ये झाला आहे. थायलंडमध्ये २ जण, जपानमध्ये एकाला, अमेरिकामध्ये एकाला आणि दक्षिण कोरियातही या व्हायरसची लागण झाल्याची माहिती मिळत आहे.
डिसेंबर २०१९ पासून चीनमध्ये कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. नववर्षासाठी चीनमध्ये आलेल्या विविध देशातील लोकांना, यावेळी संसर्ग होऊन तो इतर देशांमध्येही पसरला असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आतापर्यंत कोरोनामुळे जवळपास ३०० जणांचा बळी गेला आहे.
भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण केरळमध्ये आढळला. त्यानंतर पुन्हा केरळमध्येच याचा दुसरा रुग्ण आढळला आहे.
कोरोना व्हायरस वेगाने पसरु लागल्यानंतर भारतीय सरकारने वुहान येथे भारतीयांना मायदेशी आणण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे धोकादायक ठिकाण झालेल्या वुहानमधील भारतीयांना सुखरूप मायदेशी आणण्यात आले आहे. शुक्रवारी आणि शनिवारी एअर इंडियाच्या विमानातून भारतीयांना दिल्ली विमानतळावर आणण्यात आलं आहे.
देशात या विषाणूच्या लागणीचे नमुने तपासण्यासाठी पुणे येथील राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्था आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद समन्वयाने काम करणार आहेत. सध्या जगातील विविध प्रयोगशाळांमध्ये कोरोना वायरसवर अधिक अभ्यास सुरू आहे.