प्रफुल्‍ल पवार, झी मीडिया, रायगड : वाढत्‍या उकाडयामुळे सध्‍या सारेच हैराण झाले आहेत. घशाला पडणाऱ्या कोरड‍वर उपाय म्‍हणून कोणी बाजारातल्या शीतपेयांचा आधार घेतंय, तर कोणी बर्फाच्‍या गोळयांवर ताव मारतंय. पण या कृत्रिम थंडाव्‍यापेक्षा ताडगोळयांसारखा नैसर्गिक उपाय केव्हाही चांगलाच परिणामकारक ठरतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोकण किनारपटटीवर नारळी पोफळी प्रमाणेच ताडाची झाडंही मोठया संख्येनं आहेत. त्‍याला येणाऱ्या छोटया नारळासारख्‍या फळांना ताडगोळे म्‍हणतात. या फळांतला गर पाणीदार आणि चवदार असतो. उंच झाडावर चढून ताडगोळे काढण्‍याएवढाच कस, फळातला गर काढण्यासाठी लागतो. उन्‍हाळयाच्‍या दिवसात येणाऱ्या या ताडगोळयांना, बाजारात चांगलीच मागणी असते.
 
उन्‍हाळयाच्‍या दिवसांत अंगाची लाही होत असताना, बच्‍चे कंपनी हातगाडीवरच्या बर्फाच्‍या गोळयांवर ताव मारतात किंवा कृत्रिम शीतपेयांकडे वळतात. त्‍यामुळे अनेकदा आजारांना निमंत्रण मिळतं. अशा वेळी नैसर्गिक थंडावा देणारे ताडगोळे शरीरातलं पाण्‍याचं प्रमाण टिकवून ठेवतात. अंगातली उष्‍णता कमी करणाऱ्या ताडगोळयांचे आयुर्वेदातही अनेक औषधी उपयोग सांगितले आहेत.


उन्‍हाच्‍या दाहकतेवर ताडगोळे हा नैसर्गिक रामबाण उपाय आहे. तेव्‍हा कृत्रिम बर्फाच गोळे तसंच शितपेयांचा नाद सोडा आणि ताडगोळयांवर ताव मारा, सोबतच ऐन गरमीत आपली तब्येतही व्यवस्थित राखा.