मुंबई : केवळ भारत नाही तर जगभरासाठी कोरोना डोकेदुखी झाली आहे. कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. अनेक देशांमध्ये ही लसीकरणाची मोहीम सुरु झाली आहे. दरम्यान अजूनही लोकांच्या मनात लसीकरणासंदर्भात संभ्रम असल्याने लोकं लस घेणं टाळत असल्याचं समोर आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान फिलिपिन्सचे राष्ट्रपती रोड्रिगो दुतेर्ते यांनी लस घेण्यास नकार देणाऱ्यांना तुरूंगात टाकलं जाण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे आता फिलिपिन्समध्ये लस न घेणाऱ्या व्यक्तीला तुरुंगाची हवा खावी लागणार असल्याची शक्यता आहे.


झी न्यूजची सहयोगी वेबसाइट WIONच्या अहवालानुसार, फिलिपिन्सचे राष्ट्रपती रोड्रिगो दुतेर्ते म्हणाले, "जर तुम्ही अशी व्यक्ती असाल ज्यांनी लस घेतली नाही आणि तुम्ही कोरोना व्हायरसचे वाहक असाल तर इतर लोकांच्या रक्षणासाठी मला तुम्हाला तुरूंगात टाकावं लागेल. त्याचप्रमाणे रोड्रिगो यांनी नेत्यांना एक यादी तयार करण्यास सांगितली आहे. या यादीमध्ये ज्या व्यक्तींनी लस घेतली आणि नकार दिला आहे त्यांच्या नावाचा समावेश करावा.


रॉड्रिगो दुतेर्ते म्हणाले, 'सध्या देश गंभीर संकटात आहे, म्हणून मला चुकीचं समजू नका. पहिल्या लाटेने खरोखरच संसाधनं संपवली आहेत. ते पुढे म्हणाले, 'आणखी एक लाट देशासाठी विनाशकारी ठरू शकते. त्यामुळे शक्य तितकं कठोर राहिलं पाहिजे.'


फिलिपिन्समध्ये कोरोना व्हायरसचा उद्रेक झाला. आतापर्यंत 13 लाखांहून अधिक लोक संक्रमित झाले असून 23 हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. 


फिलिपिन्सच्या आधी इंडोनेशियाने देखील कोरोना लस देण्यास नकार घेणाऱ्यांच्या विरोधात अशीच पावलं उचलण्याची घोषणा केली होती. इंडोनेशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी असा आदेश दिला होता की, ज्या व्यक्ती लस घेण्यास नकार देतील त्यांना सरकार शिक्षा देईल. शिवाय त्यांना दंडही ठोठावला जाईल.