मुंबई : देशात कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली आहे. सध्याच्या घडीला देशातील 18 वर्षांच्या वरील सर्वांना लस देण्यात येतेय. तर लसीकरण मोहीमेला वेग देण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता लवकरच 12 वर्षांच्या वरील मुलांचं देखील लसीकरण करण्यात येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार, आजारांनी ग्रस्त असलेल्या मुलांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे. मात्र पूर्णपणे निरोगी असलेल्या मुलांना याचा फायदा होणार नाहीये. कोविड -19 लसीकरणाबाबत सरकारच्या सल्लागार समितीनुसार सध्या देशात 40 कोटी मुलं आहेत. जर प्रत्येकाचं लसीकरण सुरू झाले, तर आधीच चालू असलेल्या 18 वर्षांच्या वरील व्यक्तींच्या लसीकरणावर परिणाम होईल.


कोरोनाच्या या कठीण काळात प्रौढ व्यक्तींचं लसीकरण करणं आवश्यक आहे. सल्लागार समितीच्या मताप्रमाणे, 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना लसीकरण केलं पाहिजे. मात्र ज्यांना गंभीर आजार आहेत केवळ त्यांचं लसीकरण करावं. प्रत्येक मुलाला शाळेत पाठवण्यापूर्वी लसीकरण करण्याची गरज नाही असं समितीचं मत आहे.


समितीचे अध्यक्ष एन.के.अरोरा म्हणाले की, पूर्णपणे निरोगी मुलांना आता लसीकरणासाठी प्रतीक्षा करावी लागेल. यावेळी सर्व मुलांचं लसीकरण सुरू करून, सुरू असलेली लसीकरण मोहीम आणखी मागे पडेल. आणि जर तरुणांसह वृद्धांना लसीचा डोस मिळाला नाही तर रुग्णालयात संसर्ग झालेल्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. 


समितीच्या सल्ल्यानुसार, कोणत्या मुलांना प्रथम मिळेल तर ज्या मुलांना गंभीर आजार असतील त्यांना प्रथम लसीकरण केलं जाईल. जसं किडनी प्रत्यारोपण, कॅन्सर किंवा हृदयाशी संबंधित आजारांनी ग्रस्त मुलांना यामध्ये प्राधान्य दिलं जाईल.


भारतातील मुलांसाठी अद्याप कोणतीही लस मंजूर झालेली नाही. मुलांमध्ये कोवॅक्सिनच्या क्लिनिकल चाचण्या चालू आहेत. झायडस कॅडिलाच्या डीएनए-आधारित लसीची चाचणी 12 ते 17 वर्षांच्या मुलांवर करण्यात आली आहे. कंपनीने लसीच्या आपत्कालीन स्थितीसाठी अर्जही केला आहे. याशिवाय, पुणेस्थित सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया 2 ते 12 वर्षांच्या मुलांवर कोवोवॅक्स लसीची 2/3 टप्प्याची चाचणी देखील घेत आहे.