सुस्मिता भदाणे, मुंबई : मोबाईलचा वापर करताना किंवा व्हिडिओ पाहताना किंवा गाणी ऐकताना हेडफोन वापरणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. सतत हेडफोन लावून तुम्ही मोठ्या आवाजाचा मारा कानावर करत असता. अशा लोकांमध्ये बहिरेपणाचे प्रमाण वाढले आहे. हेडफोन कानाला लावून थिरकणं, चालणं, किंवा नुसतं बसूनही हेडफोन्समधून गाणं ऐकणं तुम्हाला महागात पडेल. आम्ही काय सांगतोय, ते नीट ऐका. तुमच्या कानात इअरफोन असेल, तर तो काढून ऐका. कारण हेडफोन्सनं गाणं ऐकणाऱ्यांसाठी धोक्याची घंटा आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सतत हेडफोन्स किंवा इअरफोन लावून गाणी ऐकण्याची सवय असेल तर एक दिवस तुम्ही बहिरे व्हाल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतर कारणांमुळे आलेल्या बहिरेपणावर उपचार होऊ शकतात, पण तीव्र डेसिबल्सचा आवाज सतत कानावर  आदळल्यानं जो बहिरेपणा येतो, तो बरा होत नाही. सध्या चाळीस, पंचेचाळीशीतले तरुणांना बहिरेपण येत असल्याचे लक्षात आले आहे आणि या सगळ्याचं कारण म्हणजे हेडफोन्स आहे, अशी माहिती कान नाक घसा तज्ज्ञ  डॉ. श्रीनिवास चव्हाण यांनी दिली.


काय होतात परिणाम?



कानात सतत हेडफोन घातल्यानं कानातला मळ बाहेर पडत नाही. त्या मळाची गाठ होऊन ऐकू येणे कमी होते. कानाला पुरेसा कोरडेपणा न मिळाल्याने बुरशी तयार होते. त्याचा परिणाम म्हणून पू किंवा पाणी येऊन कान वाहणे सुरू होते.हेडफोन्समुळे आलेल्या या बहिरेपणाला हेडफोन्स सिंड्रोम असे म्हटले जाते. 


हेडफोन वापरणे अपरिहार्यच असेल, तर आवाज कमी ठेवा कानाच्या आत नको, तर डोक्यावर लावण्यात येणारे हेडफोन्स लावा आवाजाची तीव्रता रोखणाऱ्या इअर मफचा वापर करा. सतत वापर होत असेल, तर एक तासानंतर कानाला विश्रांती द्या. लहान मुलांना हेडफोन वापरायला मुळीच देऊ नका. कारण बहिरेपण येण्याआधी काळजी घ्या, असे डॉक्टर सांगतात.