मुंबई : भारतात सीजेरियन डिलिव्हरी आणि नॉर्मल डिलीवरीबाबत अनेक संभ्रम आहेत. सर्वसाधारणपणे रूग्णालये आणि डॉक्टरांवर केवळ पैसे उकळण्यासाठी किंवा वेळ वाचवण्यासाठी सीजेरियन करत असल्याचं बोलले जाते. ही बाब काही अंशी खरी असली तरी त्यात पूर्णत: सत्यता नाही. एका अभ्यासातून सीजेरियन बाबत धक्कादायक आकडा समोर आला आहे. १५ ते ४९ वयोगटातील जवळपास सात लाख महिलांनावर अभ्यास करण्यात आला. या अभ्यासात २०१० ते २०१६ पर्यंत भारतात सीजेरियन डिलिव्हरीचा दर १७.२ टक्के इतका होता. तर १९८८ ते १९९३ मध्ये भारतात सीजेरियन डिलीव्हरीचा दर २.९ टक्के इतका होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतात सीजेरियन डीलिव्हरी होण्याची अनेक कारणे आहेत. काही महिला प्रसुतीवेळी होणाऱ्या वेदना सहन न होत असल्याने, घाबरत असल्याने स्वत:हून सीजेरियन करण्याचे सांगतात. तसेच आजकाल एक किंवा दोन अपत्य असतात. त्यामुळे महिला डीलिव्हरीवेळी कोणताही धोका पत्करण्यास तयार नसतात. काही लोक त्यांच्या मुलांचा जन्म एखाद्या खास दिवशी किंवा खास वेळीच व्हावा म्हणून आग्रही असतात त्यामुळे सीजेरियन डीलिव्हरी करण्यात येण्याचेही समोर आले आहे.


तसेच सीजेरियन डीलिव्हरीमागे अनेक मेडिकल कारणेही असतात. आजकाल लग्न उशिरा होतात. अनेक महिला वयाच्या तिशीनंतरही आई बनतात. त्यामुळे सीजेरियनवेळी मोठ्या धोक्याचीही शक्यता असते. हायपर टेंन्शन, मधुमेह, वाढते वजन यांसारखे आजार सामान्य झाले आहेत. दररोज व्यायाम न करणे, आताची जीवनशैलीही सीजेरियनमागील महत्त्वाचे कारण आहे. 


अनेकदा सीजेरियन डीलिव्हरी ही महिलेच्या आर्थिक स्थितीवरही आधारित असल्याची माहिती एका अहवालातून समोर आली आहे. श्रीमंत महिलांमध्ये सीजेरियनचा दर अधिक तर गरिब महिलांमध्ये सीजेरियन डीलिव्हरीचे प्रमाण कमी आहे. उत्तर भारतातील बिहार आणि उत्तरप्रदेश सारख्या अधिक लोकसंख्या असणाऱ्या राज्यात ३० टक्क्यांहून अधिक मुले घरीच जन्मतात. तर दुसरीकडे दक्षिण भारतातील राज्य, महाराष्ट्र, पंजाबसारख्या आर्थिकदृष्ट्या सुबत्ता असलेल्या राज्यात ९० टक्क्याहून अधिक मुले रूग्णालयात जन्मतात. राजस्थान, बिहार, झारखंडसारख्या अविकसित राज्यात सीजेरियन डीलिव्हरीचा रेट १० टक्क्यांनी कमी आहे. तर तेलंगाना, आंध्रप्रदेश, केरळ, कर्नाटक, तमिळनाडुमध्ये सीजेरियन डीलिव्हरीचा रेट ३० ते ६० टक्के इतका असल्याचे अहवालातून समोर आले आहे. भारतातील शहरी भागात तसेच आर्थिकदृष्ट्या सुबत्ता असलेल्या लोकांमध्ये सीजेरियन डीलिव्हरी सर्वाधिक होत असल्याचे समोर आले आहे.