मुंबई : कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असताना ब्लॅक फंगस म्हणजेच म्यूकरमायकोसिसच्या प्रकरणात वाढ होणार का हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होऊ लागलाय. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत उद्भवलेली म्युकरमायकोसिसची समस्या पुन्हा एकदा उद्भवू शकते. दरम्यान दुसऱ्या लाटेत या दुर्मिळ इन्फेक्शनमुळे काही लोकांचा मृत्यूही झाला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकतेच मुंबईमध्ये ब्लॅक फंगसच्या एका रूग्णाची नोंद करण्यात आली आहे. 5 जानेवारीला कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेल्या 70 वर्षीय व्यक्तीला 12 जानेवारीला ब्लॅक फंगसची लक्षणं दिसून आली. यानंतर रुग्णाला मुंबईतील वोक्हार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.


वेळेवर उपचार न घेतल्यास ब्लॅक फंगसमुळे अंधत्व, अवयव निकामी होणं, टिश्यूंचं नुकसान होऊ शकतं. हे इन्फेक्शन नाक आणि फुफ्फुस या अवयवांवर हल्ला करू शकतं.


डेल्टा वेरिएंटमुळे उद्भवलेल्या दुसऱ्या लाटेमध्ये, हाय ब्लड शुगर आणि दीर्घकाळ स्टेरॉइड्स घेतलेल्या कोरोना रुग्णांमध्ये ब्लॅक फंगसचा धोका दिसून आला. याशिवाय रोग प्रतिकारशक्ती कमी असलेल्या किंवा अवयव प्रत्यारोपण झालेल्या रूग्णांनाही याचा जास्त धोका दिसून आला.


ब्लॅक फंगसची लक्षणं


नाक वाहणं, चेहऱ्याच्या एका बाजूला वेदना, बधीरपणा किंवा सूज, दात तुटणं, अंधुक किंवा दृष्टीची समस्या, थ्रोम्बोसिस, नेक्रोसिस, त्वचेवर जखम, छातीत दुखणं आणि श्वासोच्छवासाच्या समस्यांमध्ये वाढ ही ब्लॅक फंगसची लक्षणं आहेत.


डॉ. हनी सावला यांनी सांगितलं की, रुग्णाला अशक्तपणामुळे 12 जानेवारी रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं. त्यावेळी रूग्णाची ब्लड शुगर 532 च्या वर होती. त्यामुळे त्याला तात्काळ उपचारांसाठी नेलं. रुग्णाने तक्रार केल्यानंतर तीन दिवसांनी, त्याला गालाच्या हाडांमध्ये वेदना आणि चेहऱ्याच्या डाव्या बाजूला सूज येण्याबरोबरच ब्लॅक फंगसची लक्षणं जाणवू लागली.