रेस्टॉरंटमधून बाळाला स्तनपान करणाऱ्या महिलेला दाखवला बाहेरचा रस्ता
हॉटेलच्या स्टाफने एका स्तनपान देणाऱ्या महिलेला हॉटेलच्या बाहेर काढलं आहे.
वॉशिंग्टन : स्तनपानाबाबत अजूनही समाजात पुरेशी जनजागृती नाहीये. याचीच प्रचिती पुन्हा एकदा आली आणि ती देखील अमेरिकेमध्ये...अमेरिकेत एक हैराण करणारी घटना घडली आहे. या घटनेत हॉटेलच्या स्टाफने एका स्तनपान देणाऱ्या महिलेला हॉटेलच्या बाहेर काढलं आहे.
एक जोडपं त्यांच्या बाळाला घेऊन हॉटेलमध्ये गेलं होतं. या ठिकाणी बाळाला भूक लागली म्हणून ही महिला त्याला स्तनपान देत होती. मात्र यानंतर हॉटेलमधील स्टाफने तिला हॉटेलबाहेर काढून टाकलं. या प्रकारानंतर संतप्त महिलांना या हॉटेलला घेराव घातला. या प्रकरणानंतर अमेरिकेसारख्या देशात लोकांची अशी मानसिकता असल्याचं दिसून आल्यावर लोकंही हैराण आहेत.
अमेरिकेतील वॉशिंग्टनमध्ये राहणारी रूबी मीडेन आणि तिचा पती ऐरॉन नुकतंच दुसऱ्या बाळाचे पालक बनले. त्यांनी ठरवलं की, ते आपल्या नवजात बाळाची त्याच्या कुटुंबाशी ओळख करून देतील. यासाठी त्यांनी त्यांचं फेवरेट रेस्टॉरंड निवडलं. दोघेही रेस्टॉरंटमध्ये कुटुंबाची वाट पाहत होते. मात्र मुलाला भूक लागली आणि ते रडू लागलं. अशा परिस्थितीत रुबीने भिंतीकडे वळवून बाळाला स्तनपान देण्यास सुरूवात केलं.
काही वेळाने रेस्टॉरंट मालक त्यांच्याकडे आला आणि त्याला ताबडतोब रेस्टॉरंटमधून निघून जाण्यास सांगितलं. यावेळी जेव्हा एरॉनने कारण विचारलं तेव्हा तो काही बोलला नाही आणि त्याने पुन्हा त्या रेस्टॉरंटमध्ये येऊ नये असा इशारा दिला.
यानंतर त्या जोडप्याला फार वाईट वाटलं, म्हणून ऐरोनने ठरवलं की तो नेटवर रेस्टॉरंटच्या रिव्ह्यू विभागात आपली नाराजी व्यक्त करेल. एरॉन म्हणाला, "आम्हाला रेस्टॉरंट सोडण्यास सांगितले गेलं आणि आम्हाला कोणतंही कारण देण्यात आलं नाही म्हणून आम्ही त्या हॉटेलमध्ये परत जाणार नाही."
यावर रेस्टॉरंटच्या मालकाने एरॉनच्या लिहिण्यावर प्रतिक्रिया देखील दिली, जे वाचून अनेकांना धक्का बसला. मालकाने लिहिलं- "पुन्हा इथे न येण्याचा निर्णय घेतल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या बाळाला स्तनपान देण्यासाठी पुन्हा येथे येऊ नका. हे माझे रेस्टॉरंट आहे म्हणून माझे नियम इथे पाळले जातील. रेस्टॉरंटमध्ये जनावरांप्रमाणे नव्हे तर सुसंस्कृत लोकांसारखे वागलं जातं. प्रत्येक गोष्टीसाठी एक जागा आहे. माझं हॉटेल तुमच्या बाळाला स्तनपान देण्यासाठी नाही. क्षमस्व."
मालकाच्या उत्तराचा एरॉनने सोशल मीडियावर स्क्रीनशॉट शेअर केला आहे. हे पाहून महिला संतापल्या. त्यांनी रेस्टॉरंटच्या बाहेर याचा निषेध व्यक्त केला. त्यानंतर मालकाला रेस्टॉरंट बंद करावं लागलं असून आणि सोशल मीडियावरून खातंही हटवण्यात आलं.