मुंबई : कामाच्या व्यस्त दैनंदिनीमुळे आताच्या तरुणाईमध्ये झपाट्याने होणारे शारीरीक बदल आपण पाहत असतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्वास्थ्य चांगले असेल तर कोणत्याही कामामध्ये उत्साह हा कायम राहतो. थकलेले चेहरे, निरुत्साह, कंटाळ, अशा तक्रारी कायम तरुणांकडून एकायला मिळतात. तर जाणून घेऊयात तरुणाईमध्ये सतत वाढत चाललेली व्याधी आणि त्याची नेमकी काय कारणे असतील तसेच त्यांचे उपाय....     


सोशल मीडिया व्यसनाधीन –


तरुणाई आणि सोशल मिडीया हे गणित आता सगळ्यांना माहितच आहे. तरुणांमध्ये सोशल मिडीया वापरण्याची वाढती क्रेझ ही दिवसेंदिवस वाढतच आहे. बदलता  काळ आणि त्याला सामोरे जाण्यासाठी तरुणाई स्वतःच्यापरिने स्वतःमध्ये ही बदल घडवत असते. सोशल मिडीया वापराकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टीकोण जसा आहे तसा नकारात्मक देखील मोठ्या प्रमाणात आहे. निव्वळ समाजाला, मित्रांना दाखविण्यासाठी सोशल मिडीयाचा वारप करणारी तरुणाई अधिक दिसते. सतत फेसबुक, वॉट्सऍप, इंन्स्टाग्राम, ट्विटर यांचा वापर हानी पोहचवित असतोल. सोशल मिडीया स्लो पॉईझन आहे. सोशल मिडियामुळे मोबाईलचा मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यामुळे कामातील, अभ्यासातील आणि एकंदरीतच दैनंदिन व्यवहारातील एकाग्रता कमी होते. विशेषत: रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात मोबाईलचा वापरला जातो. मोबाईलमधून निघणाऱ्या रेडिएशनचा डोळ्यांवर विपरित परिणाम होतो. त्याचप्रमाणे मेंदूलाही ते हानी पोहचवतात.


उपाय – कमीत कमी वेळ सोशल मिडियावर घालवावा. रात्रीच्या वेळी शक्यतो मोबाईलचा वापर टाळावा. मोबाईलवर वेळ घालविण्यापेक्षा मोकळ्या हवेत फिरा. मित्र-मैत्रीनींना प्रत्यक्ष भेटण्यावर भर द्या. पुस्तक वाचन करा. नवीन कौशल्य शिका, तुमचे जे काही छंद असतील ते जोपासा.


मायग्रेन –


अभ्यासाच्या, करियरच्या किंवा ऑफिसमधील कामाच्या तणावामुळे आजकाल तरुणांमध्ये मायग्रेन म्हणजेच अर्धशिशि या विकाराच प्रमाण वाढत आहे. मायग्रेन हा आजार होण्यामागील प्रमुख कारणं म्हणजे वेळेवर न जेवणे, फास्टफूडचे अतिसेवन करणे, हार्मोनोन्समध्ये बदल, काही ठराविक अन्न पदार्थ, काही औषधे ही आहेत. त्याचबरोबर शरीरातील सोडियमचं प्रमाण कमी झाल्यामुळेही मायग्रेन होऊ शकतो.


उपाय – आहार वेळेवर घेणे. आहारात ताज्या आणि हिरव्या पालेभाज्या, बाजरी, मासे यांचा समावेश करणे. टेन्शन कमी करण्यासाठी विपश्यना साधना करावी.


पाठीचे दुखणे –


आजकालची तरुण पिढी जास्तीत जास्त वेळ संगणकावर काम करताना दिसून येते. या बैठ्या जीवनशैलीमुळे पाठ, मणका, कंबर यांचे दुखणे तरुणांमध्ये दिसते. खुर्चीत जास्तीत जास्त वेळ घालवणे, चुकीच्या पद्धतीने खुर्चीवर बसणे, व्यायामाचा अभाव असणे ही या दुखण्यांमागील प्रमुख कारण आहेत.


उपाय – नियमित व्यायाम आणि योगा करणे. प्रोटीन्स, कॅल्शिअमयुक्त आहार घेणे.


शारीरिक ताण आणि अशक्तपणा –


अधिक कामाच्या वेळा, वेळी-अवेळी खाणे, फास्टफूडचे अधिक सेवन करणे, झोप पूर्ण न होणे, सकाळी न्याहारी न करणे, मद्यपानाचे सेवन करणे या तरुणांच्या बदलत्या जीवनशैलीमुळे त्यांच्यामध्ये अशक्तपणाचे प्रमाण प्रामुख्याने वाढत आहे. हा अशक्तपणा पोषकतत्वे कमी झाल्याने आलेला असतो. त्याला न्यूट्रीशनल स्टार्वेशन म्हणतात.


उपाय – दिवसभरात भरपूर प्रमाणात पाणी पिणे. कमीत कमी तीन आणि जास्तीत जास्त पाच लीटर पाणी प्यावे. तळलेले, रस्त्यावर मिळणारे किंवा फास्टफूड खाणे टाळावे. त्याऎवजी फळे आणि फळांचा ज्युस मोड आलेली कडधान्ये, सुकामेवा यांचे सेवन करणे.


मानसिक ताण-तणाव –


नैराश्य, अपयश, प्रेमभंग, वैयक्तिक व व्यवहारिक आयुष्यतील तडजोडी, वाढती स्पर्धा यांमुळे तरुणांमध्ये आत्महत्या करण्याचं प्रमाण वाढत आहे. कामाच्या ठिकाणी असलेला तणाव, मानसिक स्वास्थ्यामध्ये सतत होणारे बदल, सहनशक्तीचा अभाव असल्याने तरुणाई क्षुल्लक कारणांमुळे सुद्धा आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतात.  


उपाय – मेडिटेशन हा एक अतिशय सोपा उपाय आताच्या तरुणाईसाठी आहे. रोज किमान विस मिनीट तरी स्वतःच्या मानसिक आरोग्यासाठी काढणे महत्वाचे आहे. आत्मपरिक्षण करणे आणि स्वतःच्या अंतरमनाचा विचार करणे. या दोन महत्वाच्या गोष्टी मेडीटेशनमध्ये शिकायला मिळतात. मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य जपण्यासाठी नक्कीच हा उपाय करावा.


डायबेटिस, वाढलेला रक्तदाब, कॅलेस्ट्रॉल, हार्ट ऍटॅक –


उतारवयात होणारे आजार हे खूप कमी वयात तरुणाईला जडत असल्याचे दिसत आहे. तीशीत- चाळीसीत सहज कोणालाही होताना दिसणारे हे आजार आजकाल सामान्य झाले आहेत. बदलते राहणीमान, खाण्यापिण्याच्या पद्धती, व्यायामाचा अभाव या मुळे हे घडत आहे.


उपाय – रोज किमान ४५ मिनिट चालणे, व्यायाम करणे फार उपयुक्त ठरते. तसेच पोषकयुक्त सकस आहार, फास्टफूड टाळणे, मद्यपान, धुम्रपान टाळावे आरोग्यासाठी मदतीचे ठरेल. मानसिक ताणतणावासाठी रोज २०-३० मिनीटे मेडिटेशन करावे. रोज ६-७ तास झोप घ्यावी.


आज आपण तरुणाईला ग्रासणाऱ्या मोठ्या पण आज काल सामान्य झालेल्या काही समस्या बद्दल माहिती करुन घेतली. तर आता या उपायाचां विचार करुन आपण सगळेच समाजात तरुणाईचे दिसणारे हे चित्र बदलण्याचा प्रयत्न करुयात.   


डॉ.अस्मिता सावे – रिजॉईस वेलनेस, आहारतज्ञ