World Cancer Day: वेळीच ओळखा कॅन्सरची लक्षणं
वेळीच लक्षणं पाहून निदान केल्याने या आजारावर मात करता येऊ शकते. यासाठीच याच्या लक्षणांची माहिती असणं महत्त्वाचं आहे.
मुंबई : जागतिक कॅन्सर दिन दरवर्षी 4 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश म्हणजे या गंभीर आजाराबाबत जनजागृती करणं आणि या आजाराने ग्रस्त रुग्णांना मदत करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करणं हा आहे.
कॅन्सर हा एक मोठा आजार आहे, ज्यासाठी वेळेवर उपचार आवश्यक आहेत. दरवर्षी भारतात आणि जगभरातील मोठ्या संख्येने लोकं या आजाराने आपला जीव गमावतात. मात्र वेळीच लक्षणं पाहून निदान केल्याने या आजारावर मात करता येऊ शकते. यासाठीच याच्या लक्षणांची माहिती असणं महत्त्वाचं आहे.
हॉपकिन्स मेडिसिनच्या अहवालानुसार, कॅन्सर हे विविध प्रकारचे असतात. कॅन्सर जसजसा वाढतो तसतसा आजूबाजूच्या अवयवांवर, रक्तवाहिन्या आणि नसांवर ताण येऊ शकतो. यामुळे कॅन्सरची काही लक्षणं दिसून येतात.
विनाकारण वजन कमी होणं
कोणत्याही कारणाशिवाय तुमचं वजन कमी होत असल्यास, तुम्ही लगेच तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. 10 पौंड किंवा त्याहून अधिक वजन कमी झाल्यास काळजी करण्याचं कारण काही नाही. मात्र यापेक्षा जास्त वजन कमी होत असेल तर सावध रहा क्वचित प्रसंगी हे कॅन्सरचं पहिलं लक्षण असू शकतं.
सतत थकवा जाणवणं
दिवसभराच्या कामानंतर आपल्याला काही प्रमाणात थकवा येतो. मात्र सतत येणारा थकवा कॅन्सरचं प्रारंभिक लक्षण असू शकतं. कॅन्सर तुमच्या शरीराला पोषक तत्वांची वाढ होण्यापासून रोखतो. ज्यामुळे अनेकदा थकवा येतो. थकवा येण्याची अनेक कारणं असू शकतात. त्यामुळे सतत थकवा येत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
ताप
ताप हे सर्दी आणि फ्लूचं एक सामान्य लक्षण असू शकत. सध्याच्या परिस्थितीत कोरोना व्हायरसमुळे येणारा ताप जास्त वेळ राहतो. पण कॅन्सरचा ताप काही प्रमाणात जाणवतो. तुम्हाला तापासोबत कोणत्याही प्रकारचे संसर्ग आणि लक्षणं नसतील आणि तुम्हाला रात्री घाम येत असेल तर ते कॅन्सरचं लक्षण असू शकतं.
त्वचेत होणारे बदल
त्वचेवर असणारे तीळ आणि चामखीळ हे देखील कॅन्सरचं कारण असू शकतात.तीळ किंवा चामखीळ पसरत नाहीत किंवा त्यांचा रंग बदलत नाही. जर असं होत असेल सावध व्हा.