पावसाळ्यात सुरक्षित ट्रेकिंगसाठी खास `10` टीप्स
पावसाळ्याच्या दिवसामध्ये निसर्गाचं मनमोहक सौंदर्य पहायला मिळतं.
मुंबई : पावसाळ्याच्या दिवसामध्ये निसर्गाचं मनमोहक सौंदर्य पहायला मिळतं. डोंगरावरील हिरवळ, ऊन पावसाचा खेळ, धुकं हे सारं अनुभवायचं असेल तर पावसाळ्याच्या दिवसामध्ये निसर्गाच्या सानिध्यामध्ये जायला हवं. अनेकजण पावळ्यात ट्रेकिंग करतात. ट्रेकिंग हा एक अॅडव्हेंचरस प्रकार आहे. त्यामुळे पावसाळ्यात तुम्ही ट्रेकिंगचा आनंद लुटणार असाल तर या गोष्टींची काळजी घ्यायला हवीच..
पावसाळ्यात सुरक्षित ट्रेकिंगसाठी खास टीप्स
ठिकाणाचा अभ्यास करा -
ट्रेकिंगसाठी जाताना त्या ठिकाणाची आधी इंटरनेटवर माहिती तपासून घ्या. पहिल्यांदा किंवा अति उंचावर ट्रेकिंगला जाणार असाल तर अनुभवी लोकांसोबत जा. त्या ठिकाणच्या जवळ हॉस्पिटल किंवा केमिस्ट कुठे असेल याची माहिती, संबंधित फोन नंबर तुमच्यासोबत ठेवा.
चेकलिस्ट -
ट्रेकिंगला जाण्यापूर्वी औषधं, आय गिअर्स, प्रथमोपचार पेटी, हॅन्ड सॅनिटायझर,बॅन्डेज, बॅटरी, टॉर्च तुमच्या बॅकपॅकमध्ये अवश्य ठेवा.
रेनकोट -
पावसात ट्रेकिंगला बाहेर पडताना चांगल्या दर्जाचं रेनकोट सोबत ठेवा.
योग्य कपडे -
ट्रेकिंगला जाताना पूर्ण बाह्याचे टी शर्ट आणि पॅन्ट घाला. यामुळे इन्सेक्ट बाईट्सचा, जखमेचा धोका कमी होतो.
पायांची काळजी -
पावसाळ्याच्या दिवसात पायांची काळजी घेणंदेखील आवश्यक आहे. तुम्हांला इंफेक्शन, अॅलर्जीचा त्रास असेल तर विशेष काळजी घ्या.
उपकरणांची काळजी घ्या -
ट्रेकिंग दरम्यान तुम्ही आय पॅड, आय पॉड, मोबाईल, कॅमेरा अशा इलेक्ट्रॉनिक वस्तू घेऊन जात असाल तर त्यासाठी वॉटर प्रुफ बॅग सोबत ठेवा.
डासांपासून सुरक्षित रहा -
पावसाळ्याच्या दिवसात साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होण्याचं प्रमाण अधिक असतं. त्यापासून बचावण्यासाठी मॉस्क्युटो रिपलंट क्रीम ठेवा.
शूज -
ट्रेकिंगसाठी चांगल्या दर्जाचे शूज वापरा. स्पोर्ट्स शूजमुळे चिखलातून चालताना पायाला ग्रिप मिळेल. सोबतच पाय, टाच दुखावण्याचा धोका कमी होतो.
व्यायाम -
ट्रेकिंगला जाण्यापूर्वी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या स्वतःला मजबूत ठेवण्यासाठी प्रयत्न करा. त्यासाठी नियमित व्यायाम करा. यामुळे ट्रेकिंगनंतर होणारा त्रास, अंगदुखी कमी होईल.
आहाराचं पथ्यपाणी -
पावसाळ्याच्या दिवसात आहाराचं पथ्यपाणी सांभाळणं गरजेचे आहे. अन्यथा दुषित पाणी, अन्नामुळे पचनाचा त्रास होऊ शकतो. ट्रेकिंगदरम्यान अति मसालेदार, तळकट पदार्थ टाळा. शरीराला उर्जा देणारे पदार्थ आहारात ठेवा. आहारात अॅन्टिऑक्सिडंटयुक्त पदार्थांचा समावेश वाढवा.
केळ, सफरचंद अशा कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्सचा आहारात समावेश वाढवा. चांगल्या दर्जाचे प्रोटीन, कार्बोहायड्रेटेस, फायबर्सचा आहारात समावेश वाढवा.