होळीच्या रंगांमुळे केसांंचे नुकसान होण्यापासून बचावण्यासाठी खास टीप्स
अनेकदा होळी आणि रंगपंचमीच्या रंगात खेळताना नकळत आपल्या त्वचेचे आणि केसांचे खूप नुकसान होते.
मुंबई : अनेकदा होळी आणि रंगपंचमीच्या रंगात खेळताना नकळत आपल्या त्वचेचे आणि केसांचे खूप नुकसान होते.
होळी खेळून झाल्यानंतरही ते काढण्यासाठी अनेक चूकीच्या पद्धतींचा वापर केला जातो. परिणामी त्वचेचे आणि केसांचे नुकसान अधिकच वाढते. हा सारा त्रास आणि चिंता टाळण्यासाठी प्रसिद्ध हेअर एक्सपर्ट जावेद हबीब यांनी काही खास टीप्स शेअर केल्या आहेत. या टीप्समुळे तुम्ही केसांचे नुकसान टाळून त्यांना पूर्वीप्रमाणेच सतेज आणि मुलायम ठेऊ शकता.
होळीच्या आनंद लुटताना या टीप्स नक्की लक्षात ठेवा –
सुगंधी तेल टाळा –
होळी खेळायला जाण्यापूर्वी त्वचेप्रमाणेच केसांनादेखील तेल लावणे फायदेशीर ठरते. किमान अर्धा तास आधी केसांना तेल लावून बाहेर पडल्यास रंगांमुळे केसांचे होणारे नुकसान टाळण्यास मदत होते. मात्र हे तेल सुगंधी किंवा केसांची वाढ होण्याकरिता बनवलेले नसावे.कटाक्षाने खोबरेल किंवा ऑलिव्ह तेलाचा वापर करा.
क्लिप, हेअर बॅन्ड टाळा –
होळी खेळताना केसांचे नुकसान होऊ नये म्हणून ते घट्ट वेणी किंवा आंबाड्यात बांधा. केस मोकळे ठेवू नका. क्लिप, हेअरबॅन्ड यामुळे केस भिजल्यानंतर त्याचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे केस टाळूपर्यंत जास्त पोहचू नये म्हणून कॅप किंवा स्कार्फ यांनी डोकं झाकून घ्या.
शॉवर कॅप घाला –
कॅप किंवा स्कार्फ घालणार असाल तर त्याखाली शॉवर कॅपही घाला. यामुळे रंगांचा थेट डोक्याशी किंवा केसांशी संपर्क येत नाही.
बेबी शाम्पू वापरा –
कोरड्या रंगाने होळी खेळली असल्यास ब्रशने डोकं हलकेच साफ करा. यामुळे रंग काढायला मदत होते. तसेच ओल्या रंगांनी किंवा केसांमध्येही ओले रंग गेले गेल्यास ते आधी पाण्याने स्वच्छ करा. त्यानंतर सौम्य, नॅचरल शाम्पू किंवा बेबी शाम्पू वापरा. यामुळे केसांचे नुकसान कमी होण्यास मदत होईल.
गरम पाण्याने केस धुणे टाळा –
केसांमधील रंग काढताना गरम पाण्याचा वापर कटाक्षाने टाळण्याचा सल्ला हेअर एक्सपर्ट जावेद हबीब यांनी दिला आहे. त्यांच्या सल्ल्यानुसार, होळीच्या रंगामुळे केस खराब होण्याची शक्यता दाट असते. सोबतच गरम पाण्याने केस धुतल्यास ते अधिक शुष्क, कोरडे होऊ शकतात. केस धुतल्यानंतरही ते ब्लो ड्रायरने सुकवणं टाळा. त्यांना नैसर्गिकरित्या कोरडे होऊ द्या.
नैसर्गिक रंगांचा वापर करा –
होळी खेळताना केसांचे कमीत कमी नुकसान व्हावे याकरिता केमकल फ्री आणि नैसर्गिक रंगांचा वापर अधिक करा. यामुळे होळीचाही आनंद घेता येईल सोबतच केसांचे नुकसान होणार नाही. होळीनंतर केसांचे आरोग्य जपण्यासाठी अधिक काळजी घ्या.
होळीनंतर केसांचे आरोग्य जपण्यासाठी कोणती काळजी घ्याल ?
केसांना ड्राय केले असल्यास प्री-कंडिशनिंग अवश्य करा. केसांना धुण्यापूर्वीदेखील 5 मिनिटे आधी तेलाचा मसाज करा. यामुळे केसांचे नुकसान टाळायला मदत होईल. होळीनंतरही 2 आठवडे केसांना गरम पाणी, ब्लो ड्रायर लावणे टाळा.
उन्हात बाहेर पडणार असाल तर छत्रीचा वापर करा. केस स्प्लिट / दुतोंडी झाले असल्यास ते कापा. केसांचे नुकसान झालेले असल्यास हेअर स्पा घ्या. तसेच केसांना किमान पुढील 2 आठवडे रंगवणे टाळा.