अचानक दात दुखीची समस्या उद्भवली तर, `हे` उपाय करुन पाहा... फायदा नक्की होईल
दात दुखण्याच्या वेदना इतक्या तीव्र असतात की, त्या माणसाला ना झोपू देत, ना कोणतं काम करु देत.
मुंबई : दातदुखीचा त्रास हा तसा कॉमन आहे. बऱ्याच लोकांना हा आजार उद्भवतो. हा त्रास कधी, कुठे आणि कोणाला उद्भवेल हे कोणाच सांगू शकत नाही. परंतु दात दुखण्याचा त्रास किती भयंकर असतो. हे मात्र तुम्हाला बरेच लोक सांगतील. लोक बऱ्याचदा असं देखील म्हणतात की, एकवेळेस आजारी पडणं, ताप येणं परवडतं, परंतु दात दुखीची समस्या... नको रे बाबा....
सकाळच्या वेळेस दात दुखू लागला तर आपल्याला दातांच्या डॉक्टरकडे जाता येते. परंतु जर रात्री दात दुखू लागले तर काय करावे? कारण या वेदना इतक्या तीव्र असतात की ती व्यक्ती रात्रभर झोपू शकत नाही.
काही वेळा दातदुखीमुळे तोंडावर सूज येते, तर कधी डोकं दुखण्यापर्यंत या वेदना जातात. दातदुखीची अनेक कारणे असू शकतात, जसे - दात स्वच्छ न करणे, कॅल्शियमची कमतरता, खूप गरम किंवा खूप थंड अन्न, बॅक्टेरियाचा संसर्ग इत्यादी.
जर तुमच्या घरातही एखाद्याला दातदुखीची समस्या असेल आणि रात्री अचानक हा त्रास होऊ लागला, तर काही घरगुती उपाय करून तुम्ही आराम मिळवू शकता. ते घरगुती उपाय कोणते आहेत? ते जाणून घ्या.
उपाय क्रमांक 1
लवंग दातदुखीवर अतिशय गुणकारी मानली जाते. लवंगात युजेनॉल असते, जे जळजळ कमी करण्यास मदत करते असे मानले जाते. त्यात प्रतिजैविक गुणधर्म देखील आहेत, जे बॅक्टेरियाची वाढ रोखण्यास मदत करतात. दातदुखीच्या वेळी तुम्ही लवंग बारीक करून दुखत असलेल्या भागावर ठेवू शकता. तसेच तुम्ही लवंग चोखू शकता.
शिवाय लवंगा घालून पाणी गरम करा आणि कोमट झाल्यावर त्या पाण्याने चूळ भरा, त्याचा खूप फायदा होईल.
दातदुखीवरही लसूण खूप उपयुक्त मानले जाते. लसणामध्ये अॅलिसिन कंपाऊंड असते जे अँटीबॅक्टेरियल गुणधर्मांनी समृद्ध असते. अशा स्थितीत दुखत असताना लसणाची एक कळी दातात दाबू शकता. याचा खूप फायदा होईल.
उपाय क्रमांक 2
जाड टॉवेलमध्ये बर्फाचे तुकडे ठेवून तो दाढेला तोंडाच्या बाहेरुन लावू शकता. याला कोल्ड कॉम्प्रेस म्हणतात. हे रक्तवाहिन्या संकुचित करते, ज्यामुळे सूज कमी होते आणि दातदुखीसाठी आराम मिळतो.
उपाय क्रमांक 3
हळद देखील दात दुखीवर चांगली मानली जाते. हळद, खडे मीठ आणि मोहरीचे तेल एका भांड्यात मिसळा आणि दुखत असलेल्या भागावर लावा, तुम्हाला लगेच आराम मिळेल. शक्य असल्यास, झोपण्यापूर्वी ते नियमितपणे लावण्याची सवय लावा. यामुळे तुमच्या दातांमध्ये बॅक्टेरिया लवकर वाढणार नाहीत आणि दुखण्याची समस्या लवकर होणार नाही.
उपाय क्रमांक 4
काही लोक दातदुखीवर हिंग खूप गुणकारी मानतात. लिंबाच्या रसात थोडी हिंग मिसळा आणि कापसाच्या साहाय्याने दातांवर लावा, असे सांगितले जाते.
असं केल्यामुळे दातदुखीमध्ये तुम्हाला खूप आराम मिळू शकतो. याशिवाय जर तुमच्याकडे पेपरमिंट असेल, तर ते देखील खूप आराम देते. पेपरमिंट बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि अँटिऑक्सिडेंट गुणधर्मांनी समृद्ध आहे, ते वेदनादायक भाग सुन्न करते.
(विशेष सूचना: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)