मासिक पाळीदरम्यान, अती रक्तस्त्रावाने त्रस्त? हे उपाय देतील आराम
सामान्यपणे मासिकपाळीदरम्यान अधिक रक्तस्राव होत असल्यास तुम्ही काही सोपे उपाय करू शकता.
मुंबई : मासिक पाळी दरम्यान हार्मोनल असंतुलनामुळे अतिरीक्त रक्तस्राव होतो. मात्र जर तुम्हाला वारंवार पॅड बदलावं लागत असेल तर याचा अर्थ हा रक्तस्त्राव सामान्य नाहीये. ही समस्या एकदा उद्भवली तर ती इतकी गंभीर नाही, परंतु प्रत्येक वेळी रक्तस्राव जास्त होत असेल तर याचं कारण फायब्रॉइड, ट्यूमर किंवा इतर कोणतीही समस्या असू शकते. अशा परिस्थितीत डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे.
सामान्यपणे मासिकपाळीदरम्यान अधिक रक्तस्राव होत असल्यास तुम्ही काही सोपे उपाय करू शकता.
शरीराला हायड्रेट ठेवा
जेव्हा मासिक पाळीत अधिक रक्तस्राव होतो त्यावेळी तुम्ही शरीर हायड्रेट ठेवलं पाहिजे. यावेळी दररोज 4 ते 6 ग्लास पाणी प्या, यामुळे तुमच्या शरीरातील रक्ताची कमतरता कमी होणार नाही. याचसोबत आहारात फळं आणि ताज्या भाज्या यांचे ज्यूस प्या. यामुळे पोषक तत्वंही शरीरात जातील आणि डिहायड्रेशनची समस्या उद्भवणार नाही.
हळदीचं दूध प्या
हळद ही वेदना कमी करणारी औषधी वनस्पती आहे. मासिक पाळीतील वेदना कमी करण्यासाठी हळदीच्या दुधाचे सेवन करावं. हळद आणि दुधाच्या मिश्रणाचे सेवन केल्याने अधिक रक्तस्रावाची समस्याही दूर होते. हळदीशिवाय तुम्ही दुधात दालचिनीही टाकू शकता. दालचिनी मासिक पाळी दरम्यान क्रॅम्प्सच्या समस्येपासून मुक्त होण्यास मदत करते.
'व्हिटॅमीन सी'युक्त फळांचा आहारात समावेश
जर तुम्हाला मासिक पाळीत अधिक रक्तस्राव येण्याची समस्या उद्भवत असेल तर तुम्ही व्हिटॅमिन सी युक्त पदार्थांचं सेवन करावं. व्हिटॅमिन सीयुक्त फळांचं सेवन केल्याने शरीराला आयर्न मिळण्यास मदत होते. यावेळी संत्र्याचं सेवन केलं पाहिजे. व्हिटॅमिन सीयुक्त फळांमध्ये स्ट्रॉबेरी, किवी, ब्रोकोली, टोमॅटो ज्यूस इत्यादींचं सेवन करावं.