यूनिसेफचा दावा; ५ वर्षांखालील प्रत्येक तीन मुलांपैकी एक कुपोषित
पाच वर्षांखालील प्रत्येक तीन मुलांपैकी एक कुपोषित - रिपोर्ट
नवी दिल्ली : यूनिसेफच्या एका अहवालनुसार, पाच वर्षांखालील प्रत्येक तीन मुलांपैकी एक कुपोषित किंवा अधिक वजन असल्याने त्रस्त असल्याची माहिती समोर आली आहे. कित्येक लहान मुलं त्यांच्या गरजेहून अतिशय कमी खातात किंवा ज्याची गरज नाही ते अधिक प्रमाणात खात असल्याचे यूनिसेफने सोमवारी प्रकाशित केलेल्या अहवालात सांगितले आहे.
या अहवालातून, कुपोषित आहाराच्या परिणामाबद्दल जगाला सतर्क करण्यात आले आहे. जगभरात आजार पसरण्यामागे आता प्रमुख कारण निकृष्ट दर्जाचा आहार हे असल्याचे सांगितले आहे.
यूनिसेफने दिलेल्या माहितीनुसार, यापैकी अनेक लहान मुलांमध्ये काही प्रमाणात अविकसित मेंदू, लक्षात ठेवण्यास होणारी समस्या, कमकुवत रोगप्रतिकार शक्ती आणि संसर्ग यांसारखे आजार होण्याचा धोका असल्याचे म्हटले आहे.
यूनिसेफचे कार्यकारी संचालक हेनरीटा फोर (Henrietta H. Fore) यांनी, चांगल्या पर्यायांच्या अभावामुळे लाखो मुले आरोग्यास योग्य नसणारे जेवण जेवत असल्याचे त्यांनी सांगितले.
अहवालमध्ये कुपोषणाचे अल्पपोषण (Undernutrition), अधिक वजन (Overweight) आणि लपलेली भूक (Hidden Hunger) असे प्रकार सांगितले आहेत.
युनिसेफच्या आकडेवारीनुसार, २०१८ मध्ये जगभरातील पाच वर्षांखालील १४.९ कोटी लहान मुले अविकसित आणि जवळपास पाच कोटी मुले कमकुवत असल्याचे समोर आले आहे. आशियामध्ये सर्वाधिक कमकुवत लहान मुले असल्याचीही माहिती आहे.
याशिवाय, पाच वर्षांखालील ३४ कोटी लहान मुले आवश्यक व्हिटॅमिन आणि इतर खनिज पदार्थांच्या कमीमुळे त्रस्त आहेत. तर ४ कोटी मुले लठ्ठपणा किंवा अधिक वजनाने त्रस्त असल्याची माहिती मिळत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये लठ्ठपणा, अधिक वजन साथीच्या रोगाप्रमाणे पसरला असल्याचे सांगण्यात आले आहे.